Satara District Bank : जावळी मतदारसंघाची निवडणूक अटळ; बिनविरोधचे स्वप्न धुळीला (File Photo)
जिल्हा बँक निवडणुकीची अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण झाली असून २१ ऑक्टोबर ही अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे तालुक्यात निवडणूक होणार की बिनविरोध यावर चर्चा सुरू असताना ठराव प्रक्रियेचे दिवस लोकांना आठवावे लागत आहेत. ठराव प्रक्रियेवेळी आखाडे येथे झालेला राडा आजही तालुक्यातील नागरिकांच्या अंगावर काटा आणतो. तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या या होम पिचवरच त्यांना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मोठा दणका दिला होता या सर्व राजकीय परिस्थिती पाहता प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे येथील निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाहीत असं त्यांच्या गटाकडून बोलले जात आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे स्वतः की विठ्ठल गोळे उमेदवार हे अर्ज माघारी पर्यंत ठरणार आहे.
गेली तीन महिन्यांपासून मतदार पोरा-बाळांपासून लांब
जावळीतील एकूण ४८ मतदारांपैकी ३८ मतदार हे १० ऑगस्ट पासून सहलीवर नेण्यात आलेले आहेत. ज्ञानदेव रांजणे यांनी सुरक्षितता म्हणून ही खबरदारी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या कुटुंबापासून लांब राहिलेल्या मतदारांनी अद्याप कुटुंबातील सदस्यांचे पोरा-बाळांचे तोंड देखील पाहिले नाही. त्यामुळे अजून एक नोव्हेंबरपर्यंत तरी या मतदारांना कुटुंबापासून लांब राहावे लागणार आहे.
रांजणे यांना हा सामना सोप्पा
गतपंचवार्षिक निवडणुकीत २८ मतदार रांजणे यांनी सहलीवर नेले होते. तरी देखील एक मताने निसटता विजय त्यांना मिळवता आला, त्यामुळे यावेळी तीन महिने अगोदरच रांजणे अलर्ट मोडमध्ये पाहायला मिळाले. अशा परिस्थिती तब्बल ३८ मतदार सहलीवर नेण्यात आले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उमेदवार असतील तर दोन ते तीन मते इकडे तिकडे होऊ शकतात. मात्र, विठ्ठल गोळे उमेदवार असतील तर ३८ पेक्षा अधिक मतदान रांजणे घेऊ शकतात. त्यामुळे रांजणे यांना हा सामना सोप्पा ठरणार आहे.
जावळीला दुसरा उमेदवार मिळणार का?
सध्या महायुतीचा जिल्हा पातळीवरील दहा जागांचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. भाजप, सेना, राष्ट्रवादी, यांना समान जागा हव्या आहेत. अशा परिस्थितीत जावळी तालुक्यात उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. त्यामुळे अर्ज माघारीपर्यंत दुसरा उमेदवार मिळणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






