
Gulabrao Patil Controversy:
वाद वाढत असल्याचे लक्षात येताच मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या स्पष्टीकरण देत त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला. “लक्ष्मी” हा शब्द त्यांनी पैसा किंवा नोटांच्या रूपात नव्हे, तर देवीच्या स्वरूपातील महिलांसाठी- आई, बहीण किंवा घरातील स्त्रियांसाठी उदाहरण म्हणून वापरल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय परंपरेत महिलांचा आदर दर्शवण्यासाठी प्रतीकात्मक संदर्भ दिल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
तसेच, लक्ष्मीचा अर्थ पैसा असा ठरवणे चुकीचे असून भारतीय संस्कृतीत हा शब्द समृद्धी, मंगलकारी शक्ती आणि घरातील महिलांच्या सन्मानाचे प्रतीक मानला जातो. विरोधकांनी विधानाचा हेतूपुरस्सर विपर्यास केल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसरीकडे गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधकांच्या प्रतिक्रियेनंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील तीव्र टीका केली आहे. दमानिया यांनी गुलाबराव पाटील यांचे स्पष्टीकरण फेटाळून लावत ते “विधानाचा हेतूपुरस्सर दिलेला बचाव” असल्याचे म्हटले.
पाटील यांनी जर “लक्ष्मी” या शब्दाने घरातील महिलांचा उल्लेख केला असेल, तर लोकांना “बाहेर खाटेवर झोपा” असा सल्ला देण्यामागील तर्क काय? असा सवाल उपस्थित केला. कुटुंबातील सदस्याचे स्वागत करण्यासाठी असा संदर्भ कोणत्याही भारतीय परंपरेत आढळत नाही, असे दमानियांनी स्पष्ट केले. अंजली दमानिया म्हणाल्या की, गुलाबराव पाटील यांचे मूळ विधान आणि नंतरचे स्पष्टीकरण पूर्णपणे विसंगत आहे. वाद निर्माण झाल्यानंतर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहेत, अशी टीकाही दमानिया यांनी केली.
नाशिकमध्ये झालेल्या एका प्रचार सभेत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ”लक्ष्मी येणार आहे” असा संदर्भ देत त्यांनी मतदारांना घराबाहेर खाट टाकून झोपण्याचा सल्ला दिल्याने विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
राज्यातील महायुतीचे नेते नगरपालिका निवडणुकीत ‘विकासासाठी निधी हवा असेल तर मत द्या’ अशा आशयाचा सर्रास प्रचार करत आहेत. मत न दिल्यास विकासकामांचा निधी मिळणार नाही, अशी धमकीसदृश भाषा वापरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील सभेत मंत्री पाटील म्हणाले, “आमदारकीचे मतदान 21 तारखेला आहे, 18 तारखेला लक्ष्मी दारोदार फिरली. विधानसभा निवडणुकीआधीही लक्ष्मी आली होती. ऊठ भक्ता, काय झोपलाय? मी आलीये तुला प्रसन्न करायला. आताही लक्ष्मी मिळेल, तुम्ही घराबाहेर झोपा.” असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं.