Holkar descendant Bhushan Singh Raje Holkar press on tiger dog tomb controversy
पुणे : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या इतिहासातील घटना आणि स्मारके यावरुन वादंग निर्माण झाला आहे. मागील आठवड्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद सुरु झाला होता. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केली जात होती. यानंतर आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याची स्मारकावरुन वाद उफाळून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी हे वाघ्या कुत्रा काल्पनिक असून ती काढून टाकण्याची मागणी केली आहे. याबाबत संभाजी भिडे यांनी याला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे सांगितले. या प्रकरणावर आता होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी त्यांचे मत मांडले आहे.
होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सध्या सुरु असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावर मत मांडले आहे. त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेवर देखील स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. भूषणसिंहराजे होळकर म्हणाले की, वाघ्या समाधीवर बोलणाऱ्या दोन्ही गटांसाठी हा भावनेचा विषय झाला आहे. वाघ्या कुत्र्याचे अस्तित्व होतं की नव्हतं याच्यावर मी बोलणार नाही. इतिहासाच्या पुराव्यांवरून वाघ्या होता की नव्हता हे ठरवता येईल, असे स्पष्ट मत भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले की, “याबाबत कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, की कोणती बाजू चूक कोणती बरोबर याच्यात न पडता, समितीने दोन्ही बाजूच्या लोकांचे म्हणणे नक्की काय आहे ते ऐकून घेतले पाहिजे. समितीने दोन्ही बाजू समजून घ्याव्यात. या प्रकरणामध्ये सामोपचाराने पुराव्यांच्या आधारावर तोडगा काढावा. होळकरांनी रायगड शिवसमाधीसाठी देणगी दिली. त्या देणगीच समाधी समितीने पुढे काय केलं हे त्यांनाच माहीत. त्यामुळे या समाधीसह आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत,” असे मत होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भूषणसिंहराजे होळकर म्हणाले की, “होळकरांनी समाजासाठी कामं केली, कोणत्या एका जाती धर्मासाठी नाही. मागच्या वेळेस वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत घडलेला विषय परत घडू नये. राजकीय हेतूसाठी कुणीही आपले अजेंडे राबवू नयेत. अहिल्यादेवींच्या जयंतीला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्रात प्रत्येक ऐतिहासिक विषय हा राजकारणाचा आणि जातीचा विषय होतोय.राजकारण्यांनी रोजगार, महागाईवर बोला, हे विषय आता काढून जाती– जातीत वाद कशाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “होळकर इंग्रजांना घाबरत नव्हते, त्यांनी थेटपणे शिवसमाधी साठी निधी दिला. शासनाने बोल घेवड्या संघटनांच्या प्रतिनिधींना आवर घालावा. संभाजीराजे सामोपचाराने बोलतात म्हणून आम्हीही सामोपचाराने बोलतोय. दोन समाजात तेढ निर्माण होऊन काही अनुचित घडलं तर आम्ही संभाजीराजांचाही विरोध करू. आतेताईपणा करून पुतळा हटवण्याचं काम कुठल्याही संघटनेने करू नये. दोन्ही बाजूच्या इतिहास अभ्यासकांना एकत्र घेऊन समिती नेमावी, मग निर्णय घ्यावा. मला या संघटनांना सांगायचंय, औरंगजेबाच्या समाधीचा विषय लावून धरणापेक्षा ताराराणींच्या समाधीचा विषय लावून धरा. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटून याविषयी चर्चा करणार असल्याचे भूषणसिंहराजे होळकर यांनी सांगितले.