shivendra raje
मेढा : जावळी तालुक्यातील वाड्या-वस्तीतील मतदारांनी विश्वास व्यक्त करून विक्रमी मतदान केलेले आहे. विधानसभेत पाच वेळा संधी दिल्यानंतर आता मंत्रिपद मिळाले आहे. पूर्वी दुसरीकडे जाऊन आपल्याला कामे मागावी लागत होती. आता आपल्याकडेच कामे देण्याचे मंत्री म्हणून अधिकार मिळाले आहेत. सर्वांनी ताकद दिल्यामुळेच मी मंत्री झालो आहे. आपल्या हक्काच्या मंत्रालयात केबिन असल्यामुळे आपल्या सर्वांच्या अशा अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
पर्यटन विभागामार्फत पर्यटन वाढीसाठी मार्ली ते रानगेघर, इंदवली, करंडी, दरे आदी गावच्या रस्त्याचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सुर्वेवाडीचाही रस्ता आपल्यालाच करावा लागणार आहे. तोही पूर्ण केला जाईल, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. जावळी तालुक्यातील रानगेघर गावचे सुपुत्र व समर्थक प्रकाश भोसले यांच्या 71 वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, युवा नेते सौरभ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री भोसले म्हणाले, ‘प्रकाश भोसपे यांचे व्यक्तिमत्व आणि नेतृत्व व मार्गदर्शन हवे असल्याने त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी’. यावेळी भोसले कुटुंबीयांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने मंत्री महोदय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला सरपंच आदिनाथ मोरे, रोहिदास भोसले, विनोद करंजकर व करंडी, रानगेघर, दरे, करहर, कुडाळ परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जावळी तालुक्यातही साताऱ्यातील कार्यकर्त्यांची नुसतीच लुडबुड
बांधकाममंत्री महोदयांच्या जावळी तालुका दौऱ्यामध्ये सातारा व परिसरातील ठराविक व मोजक्या कार्यकर्त्यांची लुडबुड पहायला मिळत असून, त्यांच्या या लुडबुडीचा त्रास जावळीकरांना अडचणीचा ठरत आहे. जावळीतील स्थानिक निष्ठावंत व सच्चा कार्यकर्त्यांना मंत्री महोदयांशी जवळीक साधण्यास त्यामुळे अडचण होत असल्याची भावना महायुतीच्या समर्थकांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. याची मंत्री महोदयांनी नोंद घ्यावी, अशी विनंती केली आहे.