
कराड तालुक्यात ३२३ अर्ज वैध; १३ अर्ज अवैध
कराड : कराड तालुक्यात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची शासकीय छाननी गुरुवारी येथील बहुउद्देशीय सभागृहात अत्यंत शांततेत पार पडली. तालुक्यातील १२ जिल्हा परिषद गट व २४ पंचायत समिती गणांसाठी दाखल एकूण ३३६ उमेदवारी अर्जांपैकी ३२३ अर्ज वैध, तर १३ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेचे ४ आणि पंचायत समितीचे ९ अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
यामध्ये जिल्हा परिषद गटनिहाय छाननीचा अहवाल पुढीलप्रमाणे : उंब्रज जिल्हा परिषद गटात दाखल झालेल्या अर्जांपैकी पूर्वा संतोष बेडके आणि संजीवनी सुरेश देशमाने यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले असून, उर्वरित सर्व अर्ज वैध ठरले. पाल जिल्हा परिषद गटात योगीराज जगन्नाथ सरकाळे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. वारुंजी जिल्हा परिषद गटातून दाखल झालेल्या अर्जांमध्ये प्रशांत भीमराव थोरवडे यांचा अर्ज छाननीत अवैध ठरला, तर उर्वरित मसूर, कोपर्डे हवेली, सैदापूर, तांबवे, विंग, कार्वे, रेठरे बुद्रुक, काले व येळगाव या सर्व जिल्हा परिषद गटांतील उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरले आहेत.
पंचायत समिती गणनिहाय छाननीचा अहवाल पुढीलप्रमाणे : उंब्रज पंचायत समिती गणातून दादा निवृत्ती कांबळे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. चरेगाव पंचायत समिती गणातून संजीवनी सुरेश देशमाने यांचा उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरविण्यात आला. तांबवे पंचायत समिती गणातून सविता रामचंद्र ढवळे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. तर कोळे पंचायत समिती गणातून निलेश दिनकर पवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला.
तसेच सैदापूर पंचायत समिती गणात सर्वाधिक चार उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामध्ये ज्ञानेश्वरी राहुल जानराव, सुशांत गुणवंत कांबळे, अक्षय अरविंद तुपे आणि अशोक काकासो रामुगडे यांचा समावेश आहे. पाल पंचायत समिती गणातून अजिंक्य संजय माने यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला असून, उर्वरित तळबीड, वडोली भिकेश्वर, मसूर, वाघेरी, कोपर्डे हवेली, हजारमाची, वारुंजी, कोयना वसाहत, सुपने, विंग, गोळेश्वर, कार्वे, शेरे, रेठरे बुद्रुक, काले, कालवडे, सवादे व येळगाव या सर्व पंचायत समिती गणांतील उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
अर्ज माघारीनंतर लढतींचे चित्र होणार स्पष्ट
अर्ज छाननीनंतर आता उमेदवारांना मंगळवारी (दि.२७) पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची संधी देण्यात आली आहे. कोणत्या गटात व गणात किती उमेदवार माघार घेणार, यावरच प्रत्यक्ष निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने सर्व राजकीय पक्षांचे लक्ष माघार प्रक्रियेवर केंद्रित झाले आहे.
दोन निर्णय प्रलंबित
सैदापूर जिल्हा परिषद गटातील भाजप उमेदवार सागर शिवदास, तसेच सवादे पंचायत समिती गणातील संजय शेवाळे यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय छाननीवेळी प्रलंबित ठेवण्यात आला असून, तो रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता असल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेदेखील वाचा : ZP Election : महाबळेश्वर तालुक्यात उमेदवारी अर्जांचा महापूर; अखेरच्या दिवशी तब्बल…