karuna munde claim that she know satish bhosale andDhananjay Munde resigns from MLA post
बीड : डिसेंबर महिन्यामध्ये बीडमध्ये हत्या झाली. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाला तीन महिने झाले असले तरी देखील यावरुन राज्याचे वातावरण तापले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. आता त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाल्या करुणा मुंडे?
करुणा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुंडे यांच्याबाबत त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. आमदारकी जाणार असल्याची राजकीय भविष्यवाणी करुणा मुंडे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. मी मागे त्यांचं मंत्रिपद जाणार असं म्हटलं होतं, ते खरं झालंय, आता आमदारकी देखील जाणार असं वक्तव्य करुणा मुंडे यांनी केले आहे.
करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की, “धनंजय मुंडे यांनी निवडणुकीत 200 बुथ कॅप्चर केले होते. हे सर्वांना माहीत आहे. निवडणुकीत शपथपत्रात त्यांनी माझं नाव टाकलं नव्हतं. आमच्या केसचा संदर्भही दिला नव्हता. 2014 पासून त्यांनी माझं आणि माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलं नाही. धक्कादायक म्हणजे निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यावर काही आक्षेप घेतला नाही. याच प्रकरणावर माझी लढाई सुरू आहे. आता त्याचे वॉरंट निघेल. त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल. धनंजय मुंडेंना जावं लागेल. धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाणार हे मी जसं बोलले होते, तसंच सांगते की येत्या सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल,” असा मोठा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या देखील पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरु आहे. त्याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली असून त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. यावर करुणा मुंडे म्हणाल्या की, “मी त्यांना 100 टक्के भेटले आहे. एका बँकेच्या उद्धाटनावेळी भेटले होते. आमची दोन वेळा भेट झाली होती. मला नाथगडावर दर्शनाला जायचे होते. तेव्हा मला गुंडांनी थांबविलं होतं. तेव्हा हा खोक्या भाऊ आला आणि मला घेऊन गेला होता. . माझ्या नवऱ्याचे लोक मला आडवतात आणि खोक्या भाऊ मला दर्शनाला घेऊन गेला याचा मला अभिमान वाटला होता,” असे स्पष्ट मत करुणा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच करुणा मुंडे यांनी खोक्याच्या घरावर करण्यात आलेल्या कारवाईवरुन निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, “कुणाचं घर कधी तोडू नये आणि जाळूही नये. कोणाचेही घर तोडण्याचा, जाळण्याचा अधिकार नाही. तुम्हाला घरं तोडायची आणि जाळायचीच असेल तर मंत्री, आमदारांची तोडा. हे लोक तरुणांना गुंड प्रवृत्तीकडे नेत आहेत, असं सांगतानाच वाल्मिक कराडचे घर का नाही तोडले? बीडची परिस्थिती बिकट होती. पण आता एसपी साहेबांनी ती आटोक्यात आणली पाहिजे. खोक्याचा घर तोडले. आता वाल्मीक कराड आणि आमदार, मंत्र्यांचे घरही तोडायला पाहिजे,” असा आक्रमक पवित्रा करुणा मुंडे यांनी घेतला आहे.