Maharashtra Governor CP Radhakrishnan on Hindi vs Marathi Controversy
मुंबई : महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाला आहे. मराठी अस्मितेसाठी मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी एकत्रित लढा दिला. राज्यामध्ये प्राथमिक शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर त्रिसूत्रीच्या नावाखाली हिंदी भाषा पर्यायी भाषा म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी जोरदार विरोध करण्यात आल्यानंतर शासन निर्णय रद्द करण्यात आला. यानंतर मात्र अनेक ठिकाणी हिंदी भाषिक विरुद्ध मराठी भाषिक असा वाद निर्माण झाला आहे. यावरुन वादविवाद आणि भांडणे होताना देखील दिसत आहे. यावर आता महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी वक्तव्य केले आहे.
सी पी राधाकृष्णन यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी राज्यामध्ये सुरु असलेल्या भाषेच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांचा तमिळनाडूमधील प्रसंग देखील सांगितला आहे. सी पी राधाकृष्णन म्हणाले की, “सध्याच्या घडीला मी वर्तमान पत्रांमध्ये वाचतो आहे की मराठीत बोलला नाहीतर मार खाल, तुम्हाला मारहाण होईल असे म्हटले जात आहे. मी खासदार असताना तमिळनाडूतही भाषेचा वाद झाला होता,” असे सी पी राधाकृष्णन म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे सी पी राधाकृष्णन म्हणाले की, “रात्री 9 वाजता एक वाद सुरु होता. मी चालकाला कार थांबवायला सांगितलं, जो जमाव होता त्यातले काही लोक मला पाहून पळून गेले, मी रात्री ९ वाजता येईन हे त्यांना अपेक्षित नसावं. जे लोक मार खात होते ते तिथे उभे होते मी त्यांना विचारले की काय झालं? ती माणसं माझ्याशी हिंदीत बोलू लागली. मला ती भाषा येत नाही. मग एका माणसाने मला सांगितलं की यांना तमिळ भाषा येत नाही म्हणून मारलं. बाकीचे लोक त्यांना मारत होते आणि सांगत होते की तमिळ भाषा बोला. आता मला जर मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल?” असा सवाल सी पी राधाकृष्णन यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले की, “त्यावेळी ज्यांना मारहाण झाली होती त्यांची मी क्षमा मागितली. त्यांना जेवू घातलं. ते लोक गेल्यानंतर मी तिथून निघून गेलो. मी हा प्रसंग सांगतो आहे कारण जर अशा प्रकारे भाषेच्या नावे दहशत पसरवली जात असेल तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? आपण दीर्घ काळासाठी महाराष्ट्राला वेदना देत आहोत. भाषा हा काही राजकीय पोळी भाजण्याचा मुद्दा नाही. मला हिंदी येत नाही ही बाब अडचणीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दारिद्य रेषेखालील अनेकांना बाहेर काढले आहे. त्यातही पाच टक्के लोकांना हिंदी बोलता येते,” असे देखील राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाल आहेत.