
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Viral Audio Clip : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या ऑडिओ क्लिपवरून चांगलाच गदारोळ सुरू आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या या क्लिपमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही क्लिप नेमकी कुणाकडून मिळाली? तिचा मूळ सोर्स काय? असे प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. आता खुद्द जरांगे पाटील यांनी यावर भाष्य करत एक महत्त्वाचा दावा केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की, व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगचा सोर्स आपण सांगू शकत नाही. मात्र, याबाबत माहिती हवी असेल तर रामदास कदम यांच्याकडे विचारणा करावी. कारण या क्लिपचं मूळ डिव्हाईस त्यांच्याकडेच असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, रामदास कदम यांनी आपल्याआधी दोन तास आधी ही क्लिप वाजवली होती, असंही जरांगे म्हणाले. या प्रकरणात सामान्य माणूस असता तर आधी अटक करून नंतर चौकशी झाली असती; मात्र इथे आधी एसआयटी नेमण्यात आली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी जरांगे पाटील यांनी आपल्या विरोधात काही लोकांना एकत्र केल्याचा गंभीर आरोप केला. माझ्याविरोधात बोलण्यासाठी 30 ते 35 जणांची टोळी तयार करण्यात आली असून त्यांना पूर्ण ताकद दिली जात आहे, असं ते म्हणाले.
याआधी देवेंद्र फडणवीस हे करत होते, आता एकनाथ शिंदेही हेच करत असल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्याकडे अजूनही अनेक गोष्टींची माहिती आहे. वर्ष-सहा महिने मोकळा वेळ मिळाला तर सगळं मुळासकट बाहेर काढेन, असा इशाराही त्यांनी दिला.
राजकीय विषयांबरोबरच जरांगे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून अनेक ठिकाणी फळबागा जळून गेल्या आहेत. यंदा दिवाळीचा आनंदही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही, असं ते म्हणाले.
दिवाळी साधेपणाने साजरी करा, अनावश्यक हट्ट करू नका, असं आवाहन करत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं.
एकीकडे 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या संकटाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. आता या ऑडिओ क्लिपचं मूळ सत्य तपासातून काय समोर येतं, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Ans: मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिपचा सोर्स सांगण्यास नकार दिला. मात्र, मूळ डिव्हाईस रामदास कदम यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.
Ans: जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, या ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाईस रामदास कदम यांच्याकडे आहे.
Ans: राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी धीर सोडू नये आणि कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.