Manoj Jarange Patil announces azad maidan andolan for Maratha reservation
जालना : राज्यामध्ये मागील दोन वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वीपासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी उपोषण व आंदोलन करत आहेत. त्यांना ओबीसी अंतर्गत मराठा आरक्षण हवे असल्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. जालनामध्ये माध्यमांशी संवाद साधून जरांगे पाटील यांनी उपोषणाची नवीन तारीख जाहीर केली आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत कोणतीही निर्णायक घोषणा केली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला न भूतो न भविष्यती असे एकतर्फी यश मिळाले. मनोज जरांगे पाटील यांनी पूर्णपणे रोष व्यक्त केल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये जरांगे पाटील यांच्या भूमिकेची चर्चा सुरु होती. आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उगारले आहे. तसेच याची तारीख जाहीर केली आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काय म्हणाले जरांगे पाटील?
जालनामध्ये माध्यमांशी संवाद साधताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आता नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील अशी अपेक्षा आहे. सरसकट मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सरकारने सुरु ठेवावे. आम्ही ओबीसीमध्ये पूर्वीपासून आहोत. आम्ही कोणाचं मागत नाहीये. मराठा तरुणांवरील सर्व केसेसे सरकारने मागे घ्याव्यात. जस्टीस शिंदे समिती यांचे काम पूर्वीप्रमाणे सुरु करण्यात यावे. पूर्वीचे कक्ष सुरु करावेत. या आमच्या सात ते आठ सर्व मागण्या पूर्ण कराव्यात. याचे आदेश हिवाळी अधिवेशनामध्ये काढावेत,” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
त्याचबरोबर पूर्ण मराठा समजाला सरसकट ओबीसी अंतर्गत देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “एकाही मराठ्याने घरी थांबायच नाही, सर्वांनी इथे यायचं. अंतरवली-सराटीत तुफान ताकदीने मराठ्यांनी एकत्र यायचं. जगात मराठ्यांच्या एकजुटीला तोड नव्हती. 25 जानेवारी 2025 पासून ते अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे सामूहिक आमरण उपोषण असेल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ज्यांना स्वेच्छेने उपोषणाला बसायच आहे, ते बसू शकतात. पण कोणावरही जबरदस्ती नसेल. रकारला वाईट वाटेल, पश्चाताप होईल, इतकं भयंकर आंदोलन होईल. मराठा समाजाच्या एकजुटीने सरकारचे डोळे विस्फारतील”, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
नागपूर अधिवेशनाबाबत बातमी वाचा एका क्लिकवर
पुढे उपोषणाबद्दल माहिती देताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. म्हणून मागच्या 15-16 महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. मराठ्यांची एकजूट कायम आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन कायम राहणार आहे. भविष्यातही अनेक प्रश्न असल्याने मराठ्यांची एकजूट कायम राहील. मराठा समाज इतक्या ताकदीने एकजुटीने लढला, तरी अजून मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही, म्हणून पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मत मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे.