मराठा आरक्षणाबाबत गिरीश महाजनांचा मनोज जरांगेना सल्ला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा वाद चिघळत चाललेला दिसून येत आहे. मनोज जरांगे वेगवेगळ्या पद्धतीने यासाठी लढा देत असून यावर अजूनही चर्चा चालू आहेत. दरम्यान मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोठे निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी जरांगे यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
महाजन म्हणाले की, मराठा समाजासाठी ठोस पावले उचलणारे पहिले व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावर आता मनोज जरांगे नक्की काय उत्तर देणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या मराठा आरक्षणावरून आरोप प्रत्यारोपांची फैरी चालू असल्याचेही दिसून येत आहे.
सरकारची चिंता वाढली! मराठा वादळ मुंबईत धडकणार; पश्चिम महाराष्ट्रातील मराठा आंदोलक सज्ज
फडणवीसांवर जरांगेचा आरोप
बीडमध्ये मनोज जरांगे यांनी आरोप केला की, फडणवीस मराठा समाजाला चिथावण्यासाठी “किरकोळ अडथळे” निर्माण करत आहेत. ते म्हणाले, “फडणवीस यांनी आम्हाला त्रास देण्यासाठी पोलिसांचा वापर करू नये. मी मुंबईत येत आहे आणि तिथे भेटेन.” पोलिसांचा वापर करत असल्याचा खुलेआम आरोप जरांगेने यावेळी केलाय. जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी सातत्याने केली आहे. मात्र त्यावर अजूनही काहीही तोडगा निघाल्याचे दिसून न आल्याने आता निदर्शनं करण्यात येणार असल्याचंही सांगितलं आहे.
फडणवीस यांनी ठोस काम केले – महाजन
दरम्यान या आरोपांवर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे की, फडणवीस हेच मराठा समाजाला न्याय देणारे पहिले व्यक्ती होते. ते म्हणाले, “फडणवीस हे मराठा आरक्षणासाठी ठोस पावले उचलणारे पहिले होते. दुर्दैवाने, तो निर्णय न्यायालयात टिकला नाही. परंतु मागील सरकारांनी या मुद्द्यावर काहीही केले नाही.”
महाजन पुढे म्हणाले की, जरांगे यांनी फडणवीस यांना क्रूर म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि त्याला कोणताही पाठिंबा मिळणार नाही. आंदोलनात भाषा आणि वर्तन दोन्हीवर संयम राखणे आवश्यक आहे, असा सल्ला त्यांनी दिला.
उद्धव, राज ठाकरे आणि राहुल गांधींनाही लक्ष्य
मनोज जरांगेच नाही तर गिरीश महाजन यांनीही यावेळी विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांवर हल्लाबोल केला. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. महाजन म्हणाले की, हे नेते केवळ राजकीय फायद्यासाठी विधाने करत आहेत.
२९ ऑगस्ट रोजी मोठे निदर्शन
मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाबाबत मुंबईत निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीही त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वेळा उपोषण आणि आंदोलन केले आहे. या निदर्शनात मराठा समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होऊ शकतात असे मानले जाते. आता सरकारचे यावर काय पाऊल असणार हेच पहावे लागेल आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यावर काय प्रतिक्रिया देतील याचीही सर्वांना प्रतीक्षा आहे.