दिल्लीतील आंदोलनांवरून मनसेचा सरकारला इशारा
देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात संतापाचे वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे. राजधानी दिल्लीत आधी AISF कडून मोठे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्ली दणाणून सोडली. आज (10 ऑकटोबर) कॉकरोच जनता पार्टीकडून जंतर मंतर वर आंदोलन करण्यात येणार आहे, पण त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले आहे. अश्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आंदोलनाची हाक देत राज्यभर सह्यांची मोहीम घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते यावेळी म्हणाले, “सोमवारी जागोजागी सह्यांची मोहीम करतोय. पुढचा आठवडा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर आलेली दिसेलच. त्यासाठी आम्हाला जेलमध्ये टाका, वाटेल ते करा. आज जर आवाज उठवला नाही, तर पुढची पिढी विचारेल की लोकशाहीचा गळा घोटला जात होता, तेव्हा तुम्ही कुठे होतात?” असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
ही मोहीम केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. लोकशाही वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं.
CJP Protest Live Updates: अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत? विमानात हायव्होल्टेज ड्रामा
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांना विमानातच अटक करण्यात आल्याचा मुद्दाही देशपांडे यांनी उपस्थित केला. “अभिजित दीपके याने काय केलंय? मर्डर, रेप काय केलंय? किती दिवस ठेवणार? आज आवाज दाबाल, उद्या पुन्हा आवाज उठवू. किती दिवस आवाज दाबणार?” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. सरकार आणि पोलिसांनी त्यांना जे करायचं ते करावं; मात्र मनसे आपली भूमिका सोडणार नाही, असा आक्रमक पवित्राही त्यांनी घेतला.
मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. “मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी हे सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी यासाठी केलं आहे,” असा आरोप त्यांनी केला. या प्रक्रियेत घोळ झाल्याचं सांगत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचाही उल्लेख केला.
मनसेने यापूर्वी काढलेल्या गर्जना मोर्चानंतरही आंदोलन थांबवलेलं नाही. सोमवारची सह्यांची मोहीम हा पहिला टप्पा असेल. त्यानंतर दसऱ्यापर्यंत पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल, असं सरदेसाई यांनी सांगितलं.
एकीकडे काँग्रेस SIR विरोधात रस्त्यावर उतरली आहे, तर दुसरीकडे मनसेनेही आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.






