राजधानी दिल्लीत येणाऱ्या तब्बल 250 ट्रेन्स रद्द, इंटरनेटसह 45 मेट्रो स्टेशन्सही बंद (File Photo)
शुक्रवार रात्री उशिरापासून रेल्वे आणि रस्त्याने दिल्लीत प्रवेश पूर्णपणे नियंत्रित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणाला लागून असलेल्या दिल्लीच्या सर्व रस्त्यांच्या सीमांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. गुरुग्राम, फरिदाबाद, पानिपत, गाझियाबाद आणि नोएडा येथून दिल्लीत येणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री १० वाजेपर्यंत जंतर मंतरच्या चार किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
रेल्वेने जाहीर केले आहे की, शुक्रवारी दुपारी २ नंतर आपल्या मूळ स्थानकांवरून सुटणाऱ्या आणि १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते दुपारी २ च्या दरम्यान नवी दिल्ली किंवा हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणाऱ्या २५० एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात येतील. याव्यतिरिक्त, दिल्लीजवळील शहरांमधून सुटणाऱ्या दैनंदिन पॅसेंजर गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
दिल्ली पोलिसांच्या पत्रानंतर 45 स्थानके बंद
दिल्ली पोलिसांच्या पत्रानंतर, डीएमआरसीने जनपथ, बाराखंबा रोड, पटेल चौक आणि राजीव चौक यांसह ४५ मेट्रो स्थानके बंद केली आहेत. सुरुवातीला ५७ स्थानके बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही संख्या कमी करण्यात आली.
आंदोलनास पोलिसांची परवानगी नाही
दिल्ली पोलिसांनी सीजेपीला आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही. सह पोलीस आयुक्त नुपूर प्रसाद म्हणाल्या, “आम्हाला सौरभ दास यांच्याकडून अर्ज मिळाला. तो अगदी अलीकडेच सादर करण्यात आला, तर अर्ज १० दिवस आधी सादर करणे आवश्यक असते. हा विलंब आणि मागील आंदोलनादरम्यान नियमांचे पालन न केल्यामुळे परवानगी नाकारण्यात आली.”
221 कंपन्या तैनात; कनॉट प्लेस बंद
आंदोलने हाताळण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २२१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध ठिकाणी २३००० ते २६००० जवान तैनात असतील. २०००० दिल्ली पोलीस कर्मचारीही तैनात असणार आहेत.






