New year Koregaon Bhima 207th Bravery shaurya din vijay stambha Decoration News Update
कोरेगाव भीमा : पुण्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे. आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या ऐतिहासिक स्तंभाचे दर्शन घेण्यासाठी लांबून अनुयायी येत असतात. त्यामुळे पुणे पोलीस व प्रशासनाकडून शौर्य दिनासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. तसेच कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुण्यातील कोरेगाव भीमा येथे 207 व्या शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभ शौर्यदिनी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शौर्यदिनानिमित्त अनेक राजकारणी आणि सिलेब्रिटी लोक दर्शनासाठी येत असतात. तसेच लाखो अनुयायी देखील अभिवादनासाठी येतात. त्यामुळे प्रशासनाकडून नियोजनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या धर्तीवर ऐतिहासिक विजयस्तंभास फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यासाठी ७० हजार कृत्रिम आणि १ हजार किलो खऱ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे. तब्बल वीस गुंठे जागेमध्ये असलेला ७५ फुटी ऐतिहासिक वियीस्तंभ यावर्षी कृत्रिम व खऱ्या फुलांनी सजविण्यात आला आहे. या स्तंभावर फुलांनी अशोकचक्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि संविधानाचे तैलचित्र लावण्यात आले असून ते आकर्षण ठरत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरेगाव भीमा पोलीसांचा चोख बंदोबस्त असून अनुयायींच्या सोयींसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. बंदोबस्तामध्ये पाच हजार पोलीस कर्मचारी, 750 पोलिस आधिकारी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच एक हजार होमगार्ड आणि आठ कंपन्या काम करत आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50 पोलिस टॉवर, 10 ड्रोन आणि चोरी रोखण्यासाठी विशेष पोलिस पथक आहे, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. यावेळी शांतता राखण्यासाठी 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची दंगल होऊ नये यासाठी सोशल मीडियावरही निर्बंध घालण्यात आले आहे. काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राजकारणासंबंधी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय असतो शौर्यदिन?
पेशव्यांच्या आणि दलित समाजामधील लढाईच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून विजयस्तंभला ओळखले जाते. पेशव्यांच्या राजवटीत दलितांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात होती. दलितांना त्यांचे मुलभूत अधिकारही नाकारले जात होते. त्याची प्रचंड सल दलितांच्या मनात होती. त्या अन्यायाचा वचपा काढण्यासाठी सैनिकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. पेशव्यांचा पराभव केला. याचीही किनार या विजयाला असल्यानं दलित समाजाच्या नजरेत या दिवसाचं खूप महत्त्व आहे. लाखो लोक या आपल्या हक्कासाठी आहूती दिलेल्या लोकांच्या शौर्याला सलामी देतात. तसेच त्यांना अभिवादन करतात.