
Nitesh Rane
नवरात्र उत्सवाला अजून काही काळ बाकी असला तरी महाराष्ट्रात गरबा आणि दांडियावरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरबा-दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध केल्याने या मुद्द्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नितेश राणेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आयोजकांच्या अधिकाराचा मुद्दा मान्य करतानाच अशा निर्णयांमध्ये दुहेरी निकष ठेवू नयेत, असं म्हटलं आहे.
प्यारे खान यांनी या मुद्द्यावर थेट सवाल उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या हिंदू सणाच्या कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश द्यायचा की नाही, हा आयोजकांचा निर्णय असू शकतो. मात्र, एका बाजूला सामान्य किंवा गरीब मुस्लिमांकडून आधार कार्ड मागायचं आणि दुसऱ्या बाजूला शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या प्रसिद्ध मुस्लिम व्यक्तींना स्टेजवर बोलवायचं, हे दुहेरी धोरण असल्याचं त्यांनी म्हटलं.
‘तुम्हाला स्टेजवर शाहरुख खान चालतो, सलमान खान चालतो; पण गरब्यामध्ये मुस्लिम चालत नाहीत का?’ असा खरमरीत सवाल त्यांनी उपस्थित केला.
भारताची ओळख ही विविध धर्म आणि संस्कृती एकत्र नांदणाऱ्या देशाची आहे, असंही प्यारे खान यांनी सांगितलं. भारत हा गंगा-जमुना परंपरा जपणारा देश असून अशा ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांमध्ये भेदभावाचे निकष लावणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, अहिल्यानगरमधील नवरात्र आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये प्रवेशाच्या मुद्द्यावरूनही चर्चा सुरू झाली आहे.
या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही वेगळी भूमिका मांडली आहे. मुस्लिम व्यक्ती गरब्यात सहभागी होऊन आनंद घेत असेल तर त्यात गैर काहीच वाटत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे नितेश राणेंची भूमिका, प्यारे खानांचा सवाल आणि अमृता फडणवीस यांची सर्वसमावेशक भूमिका यामुळे गरबा-दांडियाचा मुद्दा आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आला आहे.