ठाकरे गटात भुकंप? ' १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, बड्या नेत्याचा दावा
ठाकरेंचे १४ आमदार आणि काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा पटेल यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या सहा आमदारांनी शिंदेंसोबत हातमिळवणी करत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा काही आमदार आणि नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Weather Update: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; अनेक भागांत यलो अलर्ट
महिला सक्षमीकरणासोबतच महिलांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने अंधेरी पूर्व परिसरात आमदार मुरजी पटेल यांच्या वतीने ‘आवाज शिवसेनेचा, जल्लोष स्त्री शक्तीचा’ या विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
या कार्यक्रमात महिलांसाठी ग्रुप डान्स, पाककला आणि मंगळागौरीच्या विविध स्पर्धांचे आयोजित करण्यात आल्या होत्या. शेकडो महिलांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. स्पर्धेतील विजेत्या महिलांना मोठ्या प्रमाणावर पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
दरम्यान, कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार मुरजी पटेल यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठा दावा केला. मुरजी पटेल म्हणाले की, “येत्या काही दिवसांत राज्यात ‘ऑपरेशन टायगर-४’ पाहायला मिळेल.
शिवसेना ठाकरे गटाचे १४ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. हे आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील. केवळ आमदारच नव्हे, तर ठाकरेंचे नगरसेवकही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. आधी आमदारांचा आणि त्यानंतर नगरसेवकांचाही अधिकृत पक्षप्रवेश होईल,” असे त्यांनी सांगितले.
मुरजी पटेल यांच्या या दाव्यामुळे आगामी काळात शिवसेनेतील अंतर्गत राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ठाकरे गटातील १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत या दाव्यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते आणि प्रत्यक्षात कोणते राजकीय बदल घडतात, याकडे लक्ष लागले आहे.






