रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! रामवारी-श्रावणी सोमवारसाठी त्र्यंबकेश्वरला उसळणार भाविकांची गर्दी
मात्र, यंदा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेली खोदकामे, रस्त्यांची दुरवस्था आणि एकाच वेळी होणारी प्रचंड गर्दी यामुळे वाहतूक पोलिसांची मोठी परीक्षा पाहणारा हा सोमवार ठरणार आहे. मागील तीन श्रावणी सोमवारी पोलीस प्रशासनाने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने गर्दीवर नियंत्रण मिळवत वाहतूक सुरळीत ठेवली होती. मात्र, आज (७ सप्टेंबर) सातपूरपासून थेट त्र्यंबकेश्वरपर्यंत रस्त्यावर भाविकांचा अथांग सागर असणार आहे. त्यामुळे गेल्या तीन सोमवारी यशस्वी झालेले पोलीस नियोजन यंदा खऱ्या अर्थाने पणाला लागणार आहे.
२००५ सालापासून सुरू झालेली ही रामवारी दरवर्षी पहाटे ५ ते सकाळी ७ या वेळेत शहरातून बाहेर पडते. साधारण दुपारी अंजनेरी आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचतात. दरवर्षी सकाळीच वारी शहराबाहेर पडत असल्याने तिचा वाहतुकीवर फारसा परिणाम होत नव्हता आणि शहरात फारशी चर्चाही होत नव्हती. परंतु, यंदा परिस्थिती अत्यंत भीषण आहे. सातपूरच्या पुढे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, ठिकठिकाणी उघडे चेंबर्स, साचलेला चिखल आणि त्यातच एकेरी (सिंगल लेन) वाहतूक यामुळे पदयात्री भाविकांच्या आणि वाहनधारकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रामवारी आणि आवणी सोमवार निमित्त मोठ्या प्रमाणावर भाविक दिडीने त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जातील. शहर आणि ग्रामीण पोलिसांच्या समन्वयाने खासगी वाहतूक नियंत्रीत केली जाईल. धोकादायक ठिकाणी बॅरकेडींग अथवा मनुष्यबळ उपलब्ध करून भाविकांना सुरक्षित प्रवास करता येईल, याची काळजी घेण्यात येईल. -डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक
रविवारी (दि. ६ सप्टेंबर) तिसऱ्या सोमवारी झालेली प्रचंड गर्दी पाहता, अनेक भाविकांनी उद्या चौथ्या सोमवारी दर्शन आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे नियोजन केले आहे. त्यातच एकादशीचा योग आणि पदयात्रेतून येणारे हजारो भाविक यामुळे त्र्यंबकेश्वरनगरीत गर्दीचा टक्का दुपटीने वाढणार असून पोलिसांवरील ताण प्रचंड वाढणार आहे.
रामवारी आणि श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात विशेष बदल करण्यात आले आहेत. तळेगाव येथे मुख्य पार्किंग असून, तेथून केवळ एसटी बसेसच त्र्यंबकेश्वरकडे सोडल्या जातात. मात्र, तळेगावपर्यंत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातपूर येथील अमृत गार्डन बायपासवरूनच खासगी वाहने नियंत्रित केली जातील. केवळ स्थानिक आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पुढे सोडले जाईल. ज्या एकेरी रस्त्यांवर धोका आहे, तिथे तात्पुरते बॅरिकेडिंग केले जात असून, अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.
Nashik Scandal: तांत्रिक खरातने दिला नरबळी: सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाचा खळबळजनक संशय






