
बिहारच्या प्रचार सभेतून मोदींचा राहुल गांधींवर निशाणा
बिहारमध्ये पार पडले पहिल्या टप्प्यातील मतदान
११ तारखेला होणार दुसऱ्या टप्प्यातील मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ तारखेला होणार आहे. तर १४ तारखेला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील बेगुसराय या समुदायाची भेट घेतली होती. त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तेथील एका तलावात जाऊन त्यांनी डुबकी लगावली होती. कन्हैया कुमार आणि अनेक मच्छिमारांनी देखील त्यांच्यासोबत कमरेपर्यंतच्या चिखलाच्या पाण्यात प्रवेश केला होता. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभेत भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सभेत म्हणाले, “काही मोठे नेते बिहारमध्ये मासेमारी करण्यासाठी आणि डुबकी मारण्यासाठी येत आहेत. मोठी लोक या ठिकाणी मासे पाहण्यासाठी येत आहेत. बिहार निवडणुकीत बुडण्याचा (पराभूत होण्याचा) सराव करत आहेत.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीतामढी येथील प्रचार सभेतून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचासभेत आरजेडी पक्षावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, “बिहारमध्ये विरोधी पक्षाचे सरकार स्थापन झाले तर, ते बंदूक दाखवून लोकांना घाबरवतील. राजद त्यांच्या सभेत मुलांना मोठे झाल्यावर गुंड होयचे आहे असे सांगतात तेव्हा मला खूप भीती वाटते. बिहारला कुशासन, बंदूक, क्रूरता असलेल्या सरकारची गरज नाही.”
दिल्ली आणि बिहार, दोन्ही राज्यांमध्ये भाजप नेत्याचे मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी (६ नोव्हेंबर) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियेनंतर आज आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. एका भाजप नेत्याने दिल्ली आणि बिहार या दोन्ही ठिकाणी मतदान केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या काही भाजप नेत्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातही मतदान केल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे. पण, भाजपने आपचा हा दावा फेटाळून लावत ‘आप’ निवडणुकीतील पराभवाच्या निराशेतून खोटी माहिती पसरवत असल्याचा पलटवार केला आहे.