Prakash Ambedkar's Angiography Health Update By Sujat Ambedkar
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामुळे नेत्यांचे सभा, बैठका आणि दौऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती खालावली. त्यांच्या छातीमध्ये अचानकपणे दुखू लागल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गाठ झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया अकाउंटवर देण्यात आली होती. त्यानंतर आता प्रकाश आंबडेकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी अपडेट दिली आहे.
सुजात आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीबाबत मत व्यक्त केले आहे. सुजात आंबेडकर म्हणाले की, “मीडियाच्या माध्यमातून मी मीडिया आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की, इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे. सपोर्टीग स्टाफ आहे, जो बाळासाहेबांची काळजी घेत आहे. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टाफ यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नका. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपापले मतदारसंघ सांभाळा, ते सोडू नका आम्ही सर्व बाळासाहेबांच्या सोबत आहे,” असे वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सुजात आंबेडकर यांनी म्हणाले की, “काल रात्री बाळासाहेबांना छातीत दुखत होते आणि अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजीओग्राफी करण्यात येणार आहे. त्यानंतर जो रिपोर्ट येईल त्यानुसार पुढील उपचार डॉक्टर कळवतील तसे आम्ही तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवू. आम्ही डॉक्टरांच्या रिपोर्टसाठी थांबलो आहोत. जसा रिपोर्ट येईल तशी माहिती बाळासाहेबांच्या आणि वंचितच्या हॅण्डलवरून कळवण्यात येईल”
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार असल्याचेही वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर हॅण्डलवरून कळवण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडी हे महायुती आणि महाविकास आघाडीपासून स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. जागांच्या संदर्भात सुरुवातीला महाविकास आघाडीशी बोलणी झाली असली तरी चर्चा यशस्वी झाली नाही. निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती खालावल्याने पक्षाचे कार्यकर्ते चिंतेत आहेत. यामुळे निवडणुकीच्या काळात पक्षाच्या कामात अडथळा येऊ शकतो, असे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आंबेडकर लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी पक्षाचे कार्यकर्ते शुभेच्छा देत आहेत. कार्यकर्त्यांसाठी सुजात आंबेडकर यांनी काळजी न करता निवडणुकीची तयारी करण्याचे आवाहन केले आहे.