Pune rpi party protest against Rahul Solapurkar due to controversial statement
पुणे : मागील अनेक दिवसांपासून अभिनेता राहुल सोलापूरकर हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. यापूर्वी सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. आग्रा सुटकेबाबत त्यांनी विधान केल्यामुळे राजकीय नेत्यांसह सर्वांनी रोष व्यक्त केला. यानंतर राहुल सोलापूरकर यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विधान केले. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात राज्यभरामध्ये वातावरण तापले आहे. पुण्यामध्ये देखील राहुल सोलापूरकर विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू ठेवली आहे. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम सोलापूरकर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.. सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आज सोलापूरकरच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी बोलताना परशुराम वाडेकर म्हणाले, “राहुल सोलापूरकर महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. ज्या माणसाने राजर्षी शाहू महाराजांची भूमिका केली त्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? यांची पूर्णपणे कल्पना आहे, तरीही हा व्यक्ती वादग्रस्त वक्तव्य करत आहे, त्यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा तत्काल दाखल करून त्याला अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शहराध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले, “राहुल सोलापूरकरने केलेले वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. महापुरुषांविरुद्ध जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य हा व्यक्ती करत आहे. पोलिस आणि राज्य सरकारने त्याला पाठीशी घालू नये, त्याचे पोलिस संरक्षण त्वरित कमी करावे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलिस कोठडीत त्याची रवानगी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल सोलापूरकर म्हणाले की, “रामजी सपकाळ यांच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेले एक भिमराव की जो आंबावडेकर नावाच्या एका गुरुजीकडून दत्तक घेतला जातो. त्याच नावावरून पुढे भिमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जस म्हटलं आहे, तसं ते अभ्यास करून मोठे झाले आहेत त्या आर्थाने वेदांमध्ये भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर याने केलं आहे.
यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत देखील वादग्रस्त विधान केले होते. राहुल सोलापूरकर म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका कशी झाली? याबाबत राहुल सोलापूरकर यांनी अजब दावा केला आहे. महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगेरे काही नव्हते. चक्क लाच देऊन आले, त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आणि त्यांच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन ते बाहेर पडले, असे धक्कादायक विधान राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. यामुळे राज्यभरामध्ये रोष व्यक्त करण्यात आला होता. हे प्रकरण तापल्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी देखील मागितली होती. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.