

कुर्ला मारहाण प्रकरणावर सचिन सावंतांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरलं
महाराष्ट्रापेक्षा बिहार बरा - सचिन सावंत
Kurla Assault Case : महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा धर्म आणि गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेत आला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत गुन्हेगारांच्या धर्मावरून वेगवेगळे निकष लावले जात असल्याचा आरोप केला आहे. मुस्लिम समाजातील एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला 'टाइम बॉम्ब' म्हणायचं आणि इतर धर्मातील व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला 'फुलबाजा' का म्हणायचं? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
सचिन सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. गुन्हेगारी मानसिकतेला कोणताही धर्म नसतो. गुन्हा ही मानवी प्रवृत्ती असून अपराध्याचा धर्म पाहून संपूर्ण समाजाला लक्ष्य करणं चुकीचं आहे, असं ते म्हणाले.
भारतीय संविधानातील समानता, धर्मनिरपेक्षता आणि बंधुतेच्या मूल्यांच्या विरोधात अशा प्रकारचं राजकारण असल्याचं सांगत त्यांनी भाजपवर जाणीवपूर्वक दुहेरी निकष लावल्याचा आरोप केला.
कुर्ल्यात तरुण मुलामुलींना काही जणांनी केलेली मारहाण अत्यंत निषेधार्ह असल्याचं सावंत यांनी म्हटलं आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कोणालाही कायदा हातात घेण्याची मुभा देता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
मात्र, राज्यात अशा अनेक घटना घडत असताना निवडक घटनांना धार्मिक रंग देऊन राजकीय ध्रुवीकरण करणंही चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.
महाराष्ट्रातील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही सचिन सावंत यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. पुणे, ठाणे, नाशिकसह राज्याच्या विविध भागांतील गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत त्यांनी महिला अत्याचार आणि वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला.
बॉलिवूडमध्ये निर्माण झालेली दहशत असो किंवा राज्यातील विविध भागांतील गुन्हेगारी, परिस्थिती गंभीर असल्याचं ते म्हणाले. 'गुन्हेगाराचा धर्म पाहू नका, त्याने केलेला गुन्हा पाहा,' असं आवाहन करत त्यांनी सरकारला कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्याची मागणी केली.
'भाजपच्या राज्यात बिहार बरा,' अशी म्हणण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी सरकारवर बोचरी टीका केली. त्यांच्या या विधानामुळे आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.