Sanjay Dina Patil was present at Eknath Shinde's felicitation program in Delhi.
मुंबई : दिल्लीतील एका सत्कारामुळे महाराष्ट्राचे राजकारण रंगले आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. त्याचबरोबर त्यांच्या कामाचे कौतुक केले. यामुळे ठाकरे गट नाराज झाला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला असून हे राजकारण आम्हालाही कळतं असा टोला शरद पवार यांना लगावला. यावरुन राजकारण रंगलेले असताना ठाकरे गटाचा नेता देखील या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. मात्र यामध्ये फक्त शरद पवार यांच्या हस्ते सत्कार झालेला नाही. तर ठाकरे गटाचे नेते देखील कार्यक्रमाला उपस्थित राहिले असल्याचे दिसून आले आहे. शिंदेंच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचा एक खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय दीना पाटील हे देखील दिल्लीतील एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते. याबाबत मीडिया रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आली आहे. एका वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे कारण दिले आहे. सर्वपक्षीय नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, म्हणून मी तिथे गेलो होतो. महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम असल्याने तिथे गेलो होतो, असे मत खासदार संजय दीना पाटील यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांवर टीका केली होती. संजय राऊत म्हणाले होते की, कोण कोणाला टोप्या घातलंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगु होत असेल, पण याचं भान राखून आम्ही पुढचं पाऊल टाकतो, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.