Photo : X Account
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात अनेक पक्षबदलही होताना दिसत आहे. असे असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांची दिल्ली भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला. त्यानंतर राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून, बुधवारी शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि नरेश म्हस्के यांनी पवार यांनी दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. परंतु, ही एक औपचारिक भेट होती, याला राजकारणाशी जोडू नये, असे स्पष्टीकरण शिंदे गटाच्या नेत्यांनी दिले.
शरद पवार हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांच्या दिल्लीतील निवासस्थान असलेल्या 6 जनपथ रोडवर सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातच बुधवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि नरेश म्हस्के हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी शरद पवार आणि शिंदेंचा सत्कार कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे.
शरद पवार हे ज्येष्ठ नेते
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाह यांच्या सहकार्याने फोडली, महाराष्ट्राशी गद्दारी केली. त्या एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमाला पवारांनी जायला नको होते. यामुळे मराठी माणसाच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. आम्हाला तुमचे दिल्लीतील राजकारण काय आहे हे माहिती नाही. पण आम्हालाही दिल्लीतील राजकारण कळते पवार साहेब, असे विरोधकांनी म्हटले आहे.
संजय राऊत बोलले ते अगदी बरोबर
शरद पवार साहेबांनी गद्दार आणि बेईमान व्यक्तीचा सन्मान केला आहे. यावर जे संजय राऊत साहेब बोलले ते अगदी बरोबर आहे. राऊत साहेब सत्य आहे ते बोलले आहेत. शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवला होता, पण विश्वासघात झाला.
– विनायक राऊत, नेते, ठाकरे गट