सौरभ कटियार यांच्याकडे MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार
भाजपला मोठा धक्का; मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेची खासदारकीही सोडली
विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान, एमपीएससीचे सचिव सचिन महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली. त्यानंतर सचिवपदाचा कार्यभार कोणाकडे दिला जाणार याबाबत चर्चा सुरू होती. आंदोलनानंतर मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
साधारण वर्षभरापूर्वीच सौरभ कटियार यांनी एमपीएससीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला होता. त्यामुळे त्यांना आयोगाच्या कामकाजाचा काही प्रमाणात अनुभव असल्यानेच त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत भीमनवार यांना रजेवर जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
हरपाळकर यांची बदली आणि भीमनवार यांना रजेवर पाठवण्यात आल्याने आयोगातील सचिवपद आणि अध्यक्षपदाच्या कार्यभाराबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. आता सचिवपदाची जबाबदारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपवण्यात आली असून अध्यक्षपदाचा कार्यभार अन्य सदस्याकडे देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या चौकशीसाठी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, चौकशी पूर्ण करण्यासाठी समितीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
या समितीच्या स्थापनेसंदर्भातील प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर चौकशी समितीची अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर समिती प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात करेल.
पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसह एमपीएससीमधील प्रशासकीय बदलांकडे आता विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे






