कुटुंब म्हणून आम्ही एकच
पिंपरी : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबत वक्तव्य केले आहे. पण त्यांना कुणीतरी एकत्र येऊ देत नाही. त्यांच्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कुणीतरी करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तो मिठाचा खडा कोण टाकणारा आहे? ते पत्रकारांनी शोधून काढावं. मात्र, आगामी काळात नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसतील, अशी आशा अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नातून पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर बस डेपोला नव्या कोऱ्या पाच एसटी बस शासनाकडून मिळाल्या आहेत. त्याचं उद्घाटन अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अण्णा बनसोडे यांनी स्वतः एसटी बसचं सारथ्य केलं. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी एसटी बसचं स्टिअरिंग हातात घेतलं. राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दोन दिवसांपूर्वी शरद पवार वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, याबाबतचे सर्व अधिकार हे सुप्रिया सुळे यांना दिल्याचं बोललं जात आहे. यावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. ‘माझी आधीपासून शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं अशी भूमिका आहे’. आता दोन्हीकडील आमदार आणि खासदारांची भूमिका देखील तीच आहे.
…तर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल
शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. एकत्र येण्याबाबत आमच्यात काही चर्चा झालेली नाही. या दोघांमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम कुणीतरी करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. आगामी काळात नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसतील, अशी आशा देखील अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
अनेक कार्यक्रमांमध्ये नेतेमंडळी एकत्र
गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि अजित पवार हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने वारंवार एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे या भेटींना राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. “दोन्ही नेते पुन्हा एकत्र येणार का?” असा प्रश्नही आता जोरात विचारला जात आहे.