Shivendrasinhraje Bhosale
सातारा जिल्ह्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारांचा मतदानासाठी चांगला प्रतिसाद असल्याचे सांगत निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरू असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे दोन्ही उमेदवार चांगले काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे विभागातील या दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीकडे महायुतीसह विरोधी पक्षांचेही लक्ष लागले आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारांचे मतदानाचे प्रमाण, उमेदवारांना मिळालेला प्रतिसाद आणि विविध राजकीय पक्षांनी केलेली बांधणी यांचा निकालावर काय परिणाम होतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघात ८९.३९ टक्के, तर पदवीधर मतदारसंघात ६६.९२ टक्के मतदान झाले. शिक्षक मतदारांचा वाढलेला सहभाग आणि पदवीधरांच्या मतदानाची टक्केवारी या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघांतील निकालाबाबत राजकीय वर्तुळात अंदाज बांधले जात आहेत.






