रामदास कदमांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर
राज्यातील राजकारण आता एका वेगळ्याच वळणावर आल्याचं दिसत आहे. आधीच वेगवेगळ्या कारणांनी महायुतीतील नेत्यांमध्ये आपापसांमध्ये टीकाटिपण्या होताना दिसत होत्या. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमुळे त्यात आणखीनच भर पडताना दिसत आहे. जरांगेंनी फोडलेल्या ऑडिओ बॉम्बच्या आवाजामुळे आता महायुतीमध्येच पळापळ झाल्याचं दिसून येत असून भाजप आणि शिवसेना शिंदेगटात चांगलीच जुंपली असल्याचं दिसत आहे.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिपनंतर भाजपवर सडकून टीका केली. त्यावरच आता भाजपनेहू पलटवार केला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी रामदास कदमांना जोरदार प्रत्युत्तर दिलं असून ‘भाजपवर आरोप करायचे आणि त्याचवेळी महायुतीत राहायचं, हे चालणार नाही,’ अशा शब्दांत दरेकरांनी आपली नाराजी व्यक्त केली. (Pravin Darekar)
रामदास कदम यांच्या टीकेला उत्तर देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, भाजपवर खालच्या पातळीवर आरोप केले जात असतील तर पक्ष गप्प बसणार नाही. ‘भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या, हे आम्ही खपवून घेणार नाही,’ असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
प्रसाद लाड आणि काळकुटे यांच्या फोटोंचा उल्लेख करत त्यांनी राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर प्रश्न उपस्थित केले. कोणी कोणाच्या सुपाऱ्या घेतल्या, याबाबतही दरेकरांनी कदमांवर टीका केली.
कथित ऑडिओ क्लिपमधील 500 कोटींच्या व्यवहाराबाबत बोलताना दरेकर यांनी चौकशी पूर्ण होऊ द्यावी, असं म्हटलं. एकनाथ शिंदे यांनी पैसे दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत, अशी भूमिका मांडल्याचं त्यांनी नमूद केलं. क्लिपमधील संभाषणावरून लगेच निष्कर्ष काढणं योग्य नाही. तपास यंत्रणांच्या चौकशीत सत्य समोर येईल, असं दरेकर म्हणाले. महायुतीत तणाव निर्माण होईल, अशी विधानं चौकशीपूर्वी करणं टाळायला हवं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा असू शकते. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार, हे केवळ इच्छेवर नाही तर राजकीय आकडेवारीवरही अवलंबून असतं, असं दरेकर यांनी सांगितलं.
महायुतीतील प्रश्न माध्यमांसमोर मांडण्याऐवजी वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून सोडवावेत, असं आवाहनही त्यांनी केलं. युतीतील समन्वयासाठी व्यवस्था असताना सार्वजनिक आरोप-प्रत्यारोप करणं योग्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
शिंदे साहेब हे विरोधी पक्षात नाहीत, मग त्यांना घाबरण्याचं कारण काय, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला. युतीतील नेत्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून वागायला हवं, असंही ते म्हणाले.
आता रामदास कदम या प्रत्युत्तराला काय उत्तर देतात आणि कथित ऑडिओ क्लिपच्या चौकशीत काय निष्पन्न होतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Ans: भाजपवर खालच्या पातळीवर टीका केली जात असेल तर गप्प बसणार नाही, असं दरेकर म्हणाले. भाजपसोबत राहून त्याच पक्षावर टीका करणं खपवून घेतलं जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Ans: कथित क्लिपची चौकशी होऊ द्यावी आणि त्यानंतरच निष्कर्ष काढावेत, असं दरेकर म्हणाले.
Ans: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा असू शकते. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार हे केवळ इच्छेवर ठरत नाही; त्यासाठी राजकीय आकडेवारीही महत्त्वाची असते, असं दरेकर यांनी सांगितलं.






