aaditya thackeray on hindi language in primary school
मुंबई : राज्यामध्ये सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाला आहे. महायुती सरकारने पहिली ते चौथी अशा प्राथमिक शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या आदेशमधील अनिवार्य शब्द काढण्यात आला असला तरी पर्यायी भाषा म्हणून हिंदी ठेवण्यात आली आहे. या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे हिंदी भाषेच्या विरोधात राज्याचे राजकारण रंगलेले दिसत आहे.
मनसे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. पहिल्यांदाच उद्धव अन् राज ठाकरे एकत्र येणार आहेत. येत्या 5 जुलै रोजी हा मोर्चा असणार आहे. यामुळे मराठी माणसांमध्ये नवा उत्साह दिसून येत आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमुळे या दोन्ही नेत्यांचे एकत्र येणे महायुतीसाठी नवीन आव्हान निर्माण करणारे ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यंदा इयत्ता पहिलीला तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा मौखिक असेल, पुस्तकं नसतील, पण मास्तर मुलांना तिसरी भाषा शिकवतील, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जाहीर केल्याचे म्हटले जात आहे. यावरुन आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन राग व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी लिहिले आहे की, शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं आणि असे धडे घ्यावेत! असा टोला त्यांनी लगावला आहे.
शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं आणि असे धडे घ्यावेत!
आधीच पहिलीतल्या मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास!!!हे सरकार चालवताएत की कॉमेडी शो? काय बोलताय, काय ठरवताय, स्वतः जरा ऐकून बघा आणि ह्यांनाच आधी पहिलीत पाठवा! तिथेही ‘नापास’… https://t.co/i4ndqO9u9Q
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 27, 2025
पुढे आदित्य ठाकरे यांनी लिहिले आहे की, “आधीच पहिलीतल्या मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास!!! हे सरकार चालवताएत की कॉमेडी शो? काय बोलताय, काय ठरवताय, स्वतः जरा ऐकून बघा आणि ह्यांनाच आधी पहिलीत पाठवा! तिथेही ‘नापास’” असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषा आणि अस्मितेसाठी एकत्र येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, “काल राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन संजय राऊत यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर 06 तारखेला आषाढी एकादशी आहे तर त्या दिवशी मोर्चा काढणे योग्य होणार नाही. आणि 07 तारखेला सोमवार आहे तर सुट्टीचा दिवस नाही, त्यामुळे शिक्षक आणि पालकांना यादिवशी मोर्चामध्ये सहभागी होणे जमणार नाही. त्यामुळे 5 जुलैला हा मोर्चा निघणार आहे. राजकारणाची दिशा बदलणारा हा मोर्चा असणार आहे. यामध्ये कोणताही राजकीय झेंडा वापरण्यात येणार नाही. मराठी माणसांची ताकद ही काय आहे हे या मोर्चा दाखवून देईल,”असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत.