Sudhakar Badgujar enters the BJP but the displeasure of the local leaders of Nashik
Sudhakar Badgujar in BJP : नाशिक : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. पूर्वी शिवसेना ठाकरे गटामध्ये असणाऱे सुधाकर बडगुजर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बडगुजर यांनी पक्षातील कारभारावर टीका करत नाराजी व्यक्त केली होती. तर पक्षाविरोधी संशयी हालचाली करत असल्याचे कारण देत सुधाकर बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. आता भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार असलेल्या बडगुजर यांच्या प्रवेशावर मात्र स्थानिक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सुधाकर बडगुजर यांनी भाजप वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. यानंतर आता सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे नाशिकच्या राजकारणामध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. सुधाकर बडगुजर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बडगुजर यांच्यासह बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र बडगुजर यांच्या पक्षप्रवेशामुळे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये समाधानकारक वातावरण नसल्याचे दिसून येत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“आता सुरुवात आहे. सर्व सहकारी येतात. सर्व सहकारी आल्यानंतर थोड्याच वेळात आम्ही रवाना होऊ, भरपूर लोक आहेत. लवकरच चित्र स्पष्ट होईल,” अशी प्रतिक्रिया सुधाकर बडगुजर यांनी पक्षप्रवेशाबाबत दिली. आज दुपारी १ वाजता मुंबईतील भाजपच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. गिरीश महाजन आणि भाजपचे सर्व वरिष्ठ नेते या वेळी उपस्थित राहणार आहेत.
भाजपचे महत्त्वपूर्ण नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पक्षांतील अंतर्गत नाराजीवर शिक्कामोर्तब केले आहे. ते म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. स्थानिक नेतृत्व, स्थानिक आमदार आणि खासदार यांच एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते. आणि त्यामुळे नाशिकमध्ये त्यांना विरोधाची भावना आहे, अशी स्पष्ट भूमिका बावनकुळे यांनी मांडली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
चंद्रशेखर बावनकुळे यांना सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत सुधाकर बडगुजर यांना माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर ते त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. बडगुजर म्हणाले की, मी मुंबईत गेल्यावर तुम्हाला समजेल. सर्व ठरले आहे त्याशिवाय मी जातोय का? असा उलट प्रश्न सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांना केला.
भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी देखील सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे. सुधाकर बडगुजर यांच्यासोबत काम करु शकत नाही. त्या म्हणाल्या की, बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमचा विरोध कायम आहे. सोशल मीडियावर देखील आम्ही हे पोस्ट केलं होते. अशा देशद्रोही आणि बंडखोर लोकं,ज्यांनी गोळीबार केला त्यांच्यासोबत काम अवघड आहे. ज्यांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढले आणि त्यांच्या विरोधात मी अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे. ते माझ्याच मतदारसंघामध्ये आहेत. त्यामुळे अनेकदा समोरासमोर येणार. अशा लोकांबरोबर काम एकत्र कसं करणार? असा सवाल भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी उपस्थित केला आहे.