
फोटो सौजन्य - Social Media
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून कर्जत-खालापूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासमोर घारे यांचे आव्हान अजूनही कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), शेतकरी कामगार पक्ष आणि इतर मित्रपक्षांनी एकत्र येत ‘परिवर्तन विकास आघाडी’ची मोर्चेबांधणी केली आहे. या आघाडीचा उद्देश कर्जत-खालापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला रोखणे हा आहे. या एकत्रित शक्तीमुळे आमदार थोरवे यांच्यासमोर पुन्हा एकदा मजबूत राजकीय आव्हान उभे राहिले असल्याचे बोलले जात आहे.
याआधी झालेल्या कर्जत नगर परिषद निवडणुकीत सुधाकर घारे आणि शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष नितीन सावंत यांनी एकत्र येत आमदार थोरवे यांना मोठा धक्का दिला होता. त्या विजयाची पुनरावृत्ती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असून परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या जोशात काम करताना दिसत आहेत.
सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांच्या एकत्र येण्यामुळे आघाडीची ताकद अधिक वाढली आहे. या दोन्ही नेत्यांच्या समन्वयामुळे ग्रामीण आणि शहरी भागात प्रचाराला वेग आला असून, मतदारांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्जत-खालापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पंचायत समिती निवडणुकीत बीड गणातून सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता घारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड पंचायत समिती गण हा घारे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या गणात चुरस अधिक वाढली असून निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सुधाकर घारे यांनी यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवले असून, ग्रामीण भागात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. वाडी-वस्त्यांपर्यंत पोहोचून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी मागील काळात सातत्याने काम केले आहे. जिल्हा परिषदेतील प्रशासकीय अनुभव, पक्षाची ताकद आणि आता परिवर्तन विकास आघाडीचे वाढलेले बळ यामुळे आमदार थोरवे यांच्यासमोर घारे यांचे आव्हान अधिक तीव्र झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.