Uddhav Thackeray birthday Raj Thackeray at Matoshree photo with a frame of Balasaheb Thackeray
Raj Thackeray At Matoshree : मुंबई : आज शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचा 65 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र सर्वात जास्त चर्चा ही मनसे नेते राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छांची रंगली आहे. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत. दोन दशकांनंतर मातोश्रीवर आलेल्या राज ठाकरे यांच्या भेटीची आणि दोन्ही ठाकरे बंधूच्या मनोमिलनाची चर्चा रंगली आहे.
राज ठाकरे यांना मातोश्रीवर घेण्यासाठी खासदार संजय राऊत आले होते. तर स्टेजवर जाऊन राज ठाकरे यांनी शुभेच्छा देताच उद्धव ठाकरे यांनी त्यांना जवळ घेतले. राज ठाकरे यांच्या खांद्यावर असलेला उद्धव ठाकरे यांचा हात हा अनेक राजकीय संकेत देत होतो. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर असणारे समाधान आणि हास्य विलक्षण होते. शुभेच्छा देताना राज ठाकरेंनी उद्धवांना लाल गुलाबांचा गुच्छ देखील दिला. यानंतर मातोश्रीच्या आतमध्ये दोन्ही बंधूंची भेट झाली. याचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. यामुळे महायुतीला नक्कीच धडकी भरली असणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना ठाकरे गटाकडून राज-उद्धव बंधूभेटीची सोशल मीडिया पोस्ट करण्यात आली आहे. वाढदिवसानिमित्त झालेल्या मातोश्रीवरील या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहे. यामध्ये एका फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मागे दिसून येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या पुढे राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित थांबले आहे. मागे बाळासाहेब आणि पुढे राज-उद्धव असा हा राजकीय फोटो अतिशय बोलका मानला जातो आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने आणि मुंबई राखण्याच्या निश्चियावर हा फोटो नक्कीच शिक्कामोर्तब करत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर हाच फोटो मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो समक्ष काढलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना राज ठाकरे यांनी कॅप्शनमध्ये उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेनाप्रमुख म्हणून केला आहे. राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या, अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचा शिवसेनाप्रमुख म्हणून राज ठाकरेंनी उल्लेख केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या… pic.twitter.com/sFp2Hduubx— Raj Thackeray (@RajThackeray) July 27, 2025
त्याचबरोबर राज ठाकरे यांनी मातोश्रीमध्ये जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या आसनाचे देखील दर्शन घेतले आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेना ठाकरे गट व मनसे पक्षाच्या नेत्यांचे मातोश्रीवरील एकत्रित फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सगळे एकत्र! काहीच अडचण नाही! असे म्हणत सूचक विधान केले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता ठाकरे बंधू हे एकत्रित येणार का याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर ठाकरे बंधू एकत्रित आले तर मुंबईमध्ये भाजप आणि महायुतीला जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे.
सगळे एकत्र!
काहीच अडचण नाही! pic.twitter.com/MYCMRopzqz— Sanjay Raut (@rautsanjay61) July 27, 2025