ऐरोलीत मराठा फॅक्टर ठरणार निर्णायक? अंकुश कदम यांना समाजाचा वाढता पाठिंबा
सिद्धेश प्रधान/नवी मुंबई -: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरत असतानाच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐरोली विधानसभा मतदारसंघात मराठा फॅक्टर यशस्वी ठरण्याची शक्यता राजकीय तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई परिक्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या संख्येने राहतो. या ठिकाणी ४० टक्के मराठा समाजाचे मतदार दर निवडणुकीला मतदाना दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावतात. दरम्यान, यंदाची विधानसभा निवडणूक राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच होत असल्याने मराठा समाजाचा कौल ऐरोलीमध्ये निर्णायक ठरणार आहे.
यंदा ऐरोली विधानसभा मतदारसंघातून मतदारांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली असून मराठा समाजाच्या मतदारांचा कौल हा या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा ठरणार आहे. मराठा समाज ऐरोलीमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत असून समाज ज्या बाजूने कौल देईल तो ऐरोलीमधील आमदार होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
ऐरोलीमध्ये गणेश नाईक हे विद्यमान आमदार असून ते पुन्हा विधानसभा निवडणूकीला सामोरे जात आहेत. गणेश नाईक हे आगरी समाजातून येत असल्यामुळे गणेश नाईकांच्या पाठीमागे आगरी सामाजाचे मताधिक्य आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मनोहर मढवी हे देखील उभे असल्याने आगरी समाजाच्या मतांचे इथे विभाजन होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या बातम्यांसाठी इथे क्लीक करा
याचसोबत विजय चौगुले यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवून ते निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले आहे. विजय चौगुले हे वडार समाजातून येत असल्याने वडार समाज बांधव हे त्यांच्या पाठीशी आहे.. दुसरीकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते असून मराठा समाजाचा त्यांच्याकडे बहुतांशी ओढा आहे. अंकुश कदम यांनी सुरुवातीपासूनच मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या समाजसेवेची सुरुवात केल्याने मराठा चेहरा म्हणून ते लोकांच्या पसंतीस उतरत आहेत..
ऐरोली विधानसभेत निवडणुकीचं असं चित्र असताना मराठा समाज किंगमेकरच्या भूमिकेत आहे. स्थानिक मुद्द्यांना घेऊन मराठा समाजाची भाजपावर नाराजी आहे. या सर्वाचा फायदा किंवा तोटा या निवडणुकीत कुणाला होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महायुतीसंदर्भात बातम्यांसाठी इथे क्लीक करा
पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांचा अंकुश कदमांकडे ओढा
ऐरोली विधानसभा मतदारसंघांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून येणारा माथाडी वर्ग व कष्टकरी कामगार हा मोठ्या प्रमाणावर आहे. या वर्गाचं मत प्राबल्य देखील इथे मोठ्या प्रमाणावर असून याचा फायदा अंकुश कदम यांना होऊ शकतो असं बोललं जात आहे. त्यामुळे अंकुश कदमांचं ऐरोली विधानसभा मतदारसंघात पारडं जड असून मतदारांचा अंकुश कदम यांच्याकडे ओढा आहे.