हिंदू संस्कृतीत लग्न जुळवताना घर, कुटुंब आणि वधू वराचा स्वभाव याला महत्व दिलं जातं . यासगळ्याबरोबर महत्व येतं ते म्हणजे लग्नासाठी एकमेकांना वधू वर किती साजेसे आहेत हे ठरवण्यासाठी पाहिली जाते ती पत्रिका. तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची स्थिती काय आहे यावरुन वरुन तुमच्या भविष्याचा अंदाज वर्तवला जातो. लग्नासाठी पत्रिका जुळवताना असं म्हटलं जातं की तुमचे 36 पैकी किती गुण जुळतात यावरुन वधू वर एकमेकांसाठी किती योग्य आहे याला ज्योतिषी भाषेतून अंदाज व्यक्त केला जातो. याच 36 गुणांबरोबरच महत्वाचं आहे ते म्हणजे वधू किंवा वराच्या पत्रिकेतील मंगळाचं स्थान.
अनेकदा ऐकण्यात येतं की वधू किंवा वराची पत्रिका ही मांगलिक आहे. हे मांगलिक असणं म्हणजे नक्की काय, याचा आपल्या आयुष्यावर खरंच काही परिणाम होतो का ? असे प्रश्न आहेत. खरंतर मंगळ असणं म्हणजे कडक मंगळ किंवा सौैम्य मंगळ असला म्हणजे काहीतरी भयानक घडेल किंवा कोणाच्या जीवाशी खेळ होईल अशी भिती घातली जाते, ही भिती अंधश्रद्धा आहे. पत्रिका जुळवणं म्हणजे भविष्याचा अंदाज व्यक्त केला जातो. अनेकदा मंगळदोषामुळे मनात एक भिती निर्माण होते.
पत्रिकेतील एका विशिष्ट स्थानी मंगळ असल्यास त्याची ऊर्जा ही त्या व्यक्ती आयुष्यावर प्रभाव पाडत असते. मंगळाची माणसं व्हिलन असतात असा एक गैरसमज आहे. मांगलिक असणं म्हणजे स्वभावात इतरांपेक्षा जास्त स्पष्टवक्तेपणा आणि तापट वृत्ती असते. मंगळाची माणसं काहीशी धाडसी असतात. मेहनती आणि शिस्चप्रियवृत्तीची असतात. त्यामुळे ज्याचा मंगळ कडक आहे अशा व्यक्तीचं मांगलिक नसलेल्या व्यक्तीशी लग्न झालं तर स्वभावातील समतोल राखता येणं कठीण होतं किंवा संसार करताना भावना जपणं, एकमेकांना समजून घेताना त्रास व्हायचा म्हणून मांगलिक व्यक्तीचं मांगलिक असलेल्या व्यक्तीशीच लग्न लावलं जात होतं. खरंतर मांगलिक असणं म्हणजे दोष नव्हे तर मंगळ तुम्हाला तुमच्या आयुष्य़ात येणाऱ्या अडचणींशी सामना करण्याचं बळ देतो. त्यामुळे मंगळदोष आहे म्हणजे समोरच्या व्यक्तीचं काहीतरी बरं वाईट होणार असा समज चुकीचा आहे. मंगळदोष नाही धाडसाने सामोरं जाण्यासाठीचा मंगळयोग आहे.
सर्वसाधारणपणे पाहायचं झालं तर मंगळदोष म्हटलं की लग्नासाठी अनेक समस्या आता लग्न होणारच नाही अशी मनात एक समजूत तयार होते. पण खरंतर हे अर्धसत्य आहे. पुर्वाच्या काळी विचार करायचा झालाच तर आधी होणारी लग्न ही घरच्य़ांच्या संमतीने व्हायची. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी स्वाभावाने कशी आहे हे तर सोडाच पण आपला होणारा जोडीदार दिसतो कसा हे देखील भावी वधू वरांना माहित नसायचं त्यामुळे ग्रहस्थितीवरुन समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंंदाज बांधला जात असे आणि जो बहुतांश वेळी अचूक असायचा. मात्र काळ बदलला त्यामुळे प्रत्येकाची मानसिकता देखील बदलत गेली. आताच्या काळात प्रेम विवाहाला जास्त प्राधान्य दिलं जातं. त्य़ामुळे मुलाला मुलगी कशी आहे आणि मुलीला मुलगा कसा आहे, स्वभावातील गुणदोष माहिती असतात. आपण समोरच्या व्यक्तीतले गुण दोष स्विकारु शकतो का हे देखील अनुभवातून कळून येतं. त्यामुळे मंगळदोष म्हणजे काहीतरी भयानक आहे हा गैरसमज आहे.