भाद्रपद गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे. हिंदू पुरणानुसार आआद्यदेव श्रीगणेशाची पूजा करताना दुर्वा वाहिल्या जातात. गणेशपूजन हे दुर्वांशिवाय अपूर्ण आहे असं मानलं जातं की, गणपती बाप्पाला दुर्वा खूप आवडते, याची एक आख्यायिका सांगितली जाते, काय आहे ही कथा जाणून घेऊयात.
असं म्हणतात, बाप्पाने एका राक्षसाला गिळलं होतं. हिंदू धर्मातील पौराणिक कथांमध्ये श्री गणेशाचे अद्वितीय सामर्थ्य आणि बुद्धिमत्ता यांचा उल्लेख आढळतो. बाप्पा फक्त बुद्धीमानचं नाही तर सामर्थ्यशाली देखील आहे. अशीच एक अनलासुर नावाच्या राक्षसाची आख्यायिका सांगितली जाते.
अनलासुर हा एक भयंकर राक्षस होता. तो अतिशय तामसी होता. आपल्या प्रचंड अग्नीसामर्थ्यामुळे तो पृथ्वीवर, विशेषतः ऋषी-मुनी व देवतांवर अत्याचार करत असे. त्याच्याजवळ असलेल्या अग्नीतत्वामुळे पृथ्वीवर अशांतता निर्माण झाली होती. देवतांनी आणि ऋषिंनी या संकटातून मार्ग काढण्यासाठी श्रीगणेशाची आराधना केली.
श्रीगणेशाने त्यांच्या विनंतीला मान दिला आणि अनलासुराचा सामना करण्यासाठी निघाले. युद्धात अनलासुराचा नाश करणं कठीण होतं, म्हणून गणपती बाप्पांनी त्याला अखेर गिळून टाकलं. मात्र अनलासुराला गिळल्यावर त्याच्या उष्णतेमुळे बाप्पाच्या शरीराचा प्रचंड दाह निर्माण झाला. काही केल्या बाप्पाच्या शरीराचा दााह थांबत नव्हता. त्यावेळी माता पार्वतीने दुर्वांची जुडी बाप्पाच्या डोक्यावर ठेवली. दुर्वा ही औषधी वनस्पती असून ती थंड गुणधर्म असलेली आहे. तिच्या स्पर्शामुळे गणपतीच्या शरीरातील उष्णता कमी झाली आणि त्यांना शांती लाभली. म्हणूनच गणपती बाप्पांना दुर्वा अत्यंत प्रिय झाली.
याला आध्यात्माची जोड असली तरी आपली भारतीय संस्कृती ही निसर्गावर आधारित आहे. याचं वैज्ञानिक कारण पाहता, दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. रक्त शुद्धीकरण, पचनसंस्था निरोगी करण्यास दुर्वाचं सेवन फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी देखील दुर्वा फायदेशीर ठरते. दुर्वाचा रस शरीराच्या ज्या भागावर दाह होतो त्या ठिकाणी लावल्यास उष्णता कमी होण्यास मदत होते.