फोटो सौजन्य - Social Media
पंढरपुरात विटेवर विराजमान असणारे ‘भगवान विठ्ठल’ संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहेत. देव स्वतः भेटीला आला अन भक्ताची भक्ती पाहून आनंदाने येथेच स्थायिक झाला. काय आहे? भगवान विठ्ठलाची कथा… काय आहे भक्त पुंडलिकाची कथा? चला तर मग जाणून घेऊयात.
प्राचीन काळात पुंडलिक नावाचा गृहस्थ पंढरपूर भागात राहत होता. त्याला त्याच्या पत्नीवर फार प्रेम होते. निव्वळ प्रेम नव्हे तर अंध प्रेम! या प्रेमात बुडालेला पुंडलिक त्याच्या आई बाबांकडेही दुर्लक्ष करत असे. पुंडलिकाला देवभक्तीची फार आवड होती. एकदा काशीला मोक्ष प्राप्तीसाठी जात असताना तो वाट चुकला आणि एका आश्रमात येऊन पोहचला. तिथल्या ऋषींना त्याने विचारले की काशीला जाणारी वाट दाखवावी. ऋषींनी त्याला ती वाट ठाऊक नसल्याचे सांगून ते कधीही काशीला गेले नाहीत असे कारण सांगितले. पुंडलिकाला हसू आवरले नाही. त्याने हसता-हसता ऋषींना सांगितले की ‘तुम्ही एक ऋषी असून तुम्ही कधी काशीला गेला नाहीत. मग तुम्ही कसले ऋषी.” असे म्हणत तो त्याच्या वाटेला लागला.
आश्रमापासून थोड्या अंतरावर जाताच त्याला आश्रमाकडून काही महिलेच्या हसण्याचा आवाज आला. पुंडलिक पुन्हा मागे वळला. आश्रमात जाऊन पाहतो तर काय? तिथे तीन स्त्रिया आश्रमाला स्वच्छ करत होत्या. त्या स्त्रिया.. दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून स्वतः गंगा, यमुना आणि सरस्वती होत्या. ‘काशीला न जाता, या ऋषींच्या आश्रमात आणि भाग्यात इतके पावित्र आले तरी कुठून?’ असा सवाल त्यांनी केला. तेव्हा त्या मातांनी त्याला उत्तर दिले की,” या ऋषींनी आयुष्यभर त्यांच्या मात्या पित्याची सेवा केली. त्यांची निस्सीम भक्ती केली. त्यामुळे त्यांच्या पदरात हे पावित्र आले आहे. मोक्ष मिळवण्यासाठी कुण्या धार्मिक स्थळी जाण्यापेक्षा व्यक्तीचे कर्म महत्वाचे असतात.”
हे बोल ऐकून, पुंडलिकाचे डोळे उघडले. त्याला त्याच्या आईवडिलांची काशी ला नेण्याची विनंती आठवली. पुंडलिक तसाच मागे फिरला आणि घराकडे गेला. आई वडिलांनी सोबत घेऊन त्याने त्यांना काशीचे दर्शन घडवले. आई वडिलांची निस्सीम भक्ती केली. या भक्तीला पाहून स्वतः देवालाही राहवले नाही. स्वतः भगवान श्री कृष्ण पुंडलिकाच्या भेटीसाठी आले. तेव्हा पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत रमला होता. त्याने वळून पाहिले तर मागे साक्षात भगवान श्री कृष्ण उभे होते. पण पुंडलिक तेव्हा आई वडिलांच्या सेवेत तल्लीन असल्याने त्याने देवालाही प्रतीक्षा करायला सांगितले. देवाला वीट दिली आणि त्याला त्यावर काही काळ विराजमान होण्यासाठी सांगितले.
सेवा संपन्न झाल्यावर त्याने देवाची माफी मागितली. पण देव पुंडलिकाची मातृ पितृ भक्ती पाहून प्रसन्न झाला होता. या प्रसन्नतेने देवाने त्याला वरदान मागण्यास सांगितले. पुंडलिकाने देवाला प्रतीक्षा करायला लावल्याने तो दुखावला होता, पण देव त्याला निसंकोचपणे वरदान मागण्यास सांगतो. तेव्हा पुंडलिक भगवान श्री कृष्ण यांना ‘भक्तांची काळजी करण्यासाठी पृथ्वीवर स्थायिक होण्यास सांगतो.” तेव्हा विटेवर उभा असणारा भगवान विठ्ठल जिथे स्थायिक होतो ते ठिकाण म्हणजे आजचे पंढरपूर! मुळात, पंढरपूरमध्ये स्थित असलेली श्री विठ्ठलांची मूर्ती स्वयंभू आहे. कोणत्याही शिल्पकाराने त्याला घडवले नाही.