फोटो सौजन्य- pinterest
दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणांमधील सण म्हणजे नरक चतुर्दशी. हा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो. दिवाळीच्या आदल्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. याला छोटी दिवाळी असेही म्हणतात. हा सण धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी यमराजाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची भीती दूर होते. पंचांगानुसार, यंदा नरक चतुर्दशी सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी आहे. असे म्हटले जाते की, नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. या दिवशी यमराजाच्या पूजेसोबतच काही विशेष उपायही केले जातात.
नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवा लावल्याने कुटुंबातील अकाली मृत्युची भीती नाहीशी होते. नकारात्मक ऊर्जा देखील घरापासून दूर ठेवली जाते. यासाठी हिंदू धर्मग्रंथांमध्ये नरक चतुर्दशीला दिवा लावण्यासाठी काही नियम सांगण्यात आलेले आहे. नरक चतुर्दशीला दिवा लावण्याचे काय आहेत नियम जाणून घ्या
नरक चतुर्दशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला येते. यंदा चतुर्दशीची तिथीची सुरुवात रविवार, 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.51 वाजता होणार आहे. यावेळी चतुर्दशी तिथीची समाप्ती सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.44 वाजता होईल. त्यामुळे यंदा नरक चतुर्दशीचा सण सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
हा दिवा नेहमी चार दिशेला प्रज्वलित होईल असा असावा. त्याला चार वाती देखील असाव्यात. या दिव्याच्या चार वाती चारही दिशांना प्रकाश पसरण्याचे प्रतीक आहेत. चार बाजू असलेला दिवा लावल्याने भगवान यम प्रसन्न होतात. हा दिवा कुटुंबाचे अकाली मृत्यू आणि गंभीर संकटांपासून रक्षण करतो.
शास्त्रांमध्ये यमदीप कोणत्या दिशेने लावायचा याचे वर्णन करण्यात आलेले आहे. दक्षिण दिशेला यमराजाची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला दिवा लावणे शुभ मानले जाते. या दिवशी यमराजासाठी माती किंवा पिठाचा दिवा लावावा. मोहरीच्या तेलाशिवाय इतर कोणत्याही तेलाने शक्यतो दिवा लावू नये.
दिवा लावताना 14 दिवे लावावेत. हे दिवे घरातील विविध ठिकाणी ठेवावेत. जसे की, देव्हारा, स्वयंपाकघर पिण्याच्या पाण्याची जागा, तुळशीच्या रोपाजवळ, मुख्य प्रवेशद्वार, गच्ची इत्यादी ठिकाणी घरामध्ये हे दिवे लावणे खूप शुभ मानले जाते.
दिवा लावून झाल्यानंतर तो सर्वप्रथम घरामध्ये फिरवावा. त्यानंतर घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा. दिवा लावताना, तो परिसर स्वच्छ आणि शुद्ध असल्याची खात्री करा. नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी दिवा लावावा. दरम्यान, लोक धनत्रयोदशीलाही यमदीप प्रज्वलित करतात. जर तुम्हाला धनत्रयोदशीला यमदीप प्रज्वलित करायचा असल्यास 18 ऑक्टोबरच्या संध्याकाळी करावा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)