
फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या पूजेसाठी समर्पित आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी यांची पूजा केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होते अशी मान्यता आहे. प्रदोष व्रत हे महिन्यातून दोन वेळा पाळले जाते. यावेळी महादेवाचे भक्त उपवासदेखील करतात. या शुभ मुहूर्तावर भगवान शिवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते.
महादेवांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत हे सर्वांत महत्त्वाचे व्रत मानले जाते. हा दिवस देवी पार्वती आणि महादेवांना समर्पित आहे. असे मानले जाते की, प्रदोष व्रताच्या दिवशी दीपप्रज्वलन केल्याने भक्तावर महादेवाचा आशीर्वाद वर्षाव होतो आणि आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते. जाणून घ्या कधी आहे प्रदोष व्रत आणि कोणते उपाय करायचे.
पंचांगानुसार, कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीची सुरुवात मंगळवार, 22 जुलै रोजी सकाळी 07.05 वाजता सुरू होईल आणि या तिथीची समाप्ती बुधवार, 23 जुलै रोजी सकाळी 4.39 वाजता होईल. उद्यतिथीनुसार प्रदोष व्रत आज मंगळवार, 22 जुलै रोजी पाळले जाणार आहे.
प्रदोष व्रताच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तसेच देवीचा आशीर्वादही मिळतो.
देव्हाऱ्यात महादेवांसमोर तीळ किंवा तुपाचा दिवा लावावा. हा उपाय केल्याने कर्जातून मुक्तता होते, अशी मान्यता आहे.
तुमच्या घरात तुळशीचे रोप असल्यास प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावा. असे केल्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येते आणि उत्तम आरोग्य मिळते.
स्वयंपाकघरात दिवा लावल्याने देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते, असे म्हटले जाते. तसेच घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.
घरामध्ये तुम्ही ज्याठिकाणी पिण्याचे पाणी ठेवता त्या ठिकाणी दिवा लावा. ज्यामुळे तुमच्या घरामध्ये शांती आणि आनंद राहील.
मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला भौम प्रदोष व्रत म्हटले जाते. भौम प्रदोष व्रताच्या दिवशी शिवाची पूजा केल्याने जीवनातील अनेक अडथळे दूर होतात. मांगलिक दोषाने ग्रस्त असलेल्यांसाठी हा दिवस फायदेशीर मानला जातो. दरम्यान करिअरशी संबंधित अडथळे देखील कमी होऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)