फोटो सौजन्य- istock
श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे. या महिन्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या महिन्यामध्ये शिव आणि पार्वती यांची भेट झाली होती. भगवान शिव पार्वतीच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले होते, असे म्हटले जाते. श्रावण महिन्यात विधीवत महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. श्रावण महिना खूप खास मानला जात असला तरी श्रावणात येणाऱ्या सोमवारला विशेष महत्त्व आहे. श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. यावेळी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार 28 जुलै रोजी आहे. तसेच या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे. या शुभ योगायोगामुळे आजचा दिवस खूप खास असल्याचे म्हटले जाते.
पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै
दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्ट
तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट
चौथा श्रावणी सोमवार 18 ऑगस्ट
श्रावणातील सोमवारचा दिवस खास मानला जातो. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या वाराला उपवास करतात. त्याचप्रमाणे सोमवारी उपवास करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर ध्यान करावे. ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करावा. तसेच महादेवाची मनोभावे विधीवत पूजा करावी.
पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै रोजी आहे या दिवशी तांदळाची शिवामूठ वाहतात हे करत असताना नमः शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने। शृकडिभृडि महाकालणयूक्ताय शम्भवे।। या मंत्राचा जप केला जातो. हिंदू धर्मात लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्षे महिला हे व्रत करतात. श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ वाहिली जाते. शिवामूठ वाहण्याला मोठा वसा असल्याचे मानले जाते. या प्रकारची व्रतवैकल्ये महिला आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी आनंदाने करतात. तर दुसऱ्या सोमवारी म्हणजे यावेळी येणारा 4 ऑगस्ट रोजीचा सोमवार या दिवशी तीळ याची शिवामूठ वाहिली जाते. त्यासोबत तिसऱ्या सोमवारी म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी मूगाची शिवामूठ वाहण्यात येणार आहे. तर शेवटचा श्रावणी सोमवार हा 18 ऑगस्ट रोजी आहे या दिवशी जव याची शिवामूठ वाहण्यात येणार आहे.
श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ शिवलिंगावर अर्पण केली जाते. शिवामूठ अर्पण करणे म्हणजे वेगवेगळे धान्य अर्पण करणे. त्याचसोबत भक्तिभावाने महादेवांची पूजा करणे.
( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)