ब्रम्हांडनायक किंवा स्वामी समर्थ माऊली अशा नावाने स्वामी समर्थांचे भक्त त्यांना प्रेमाने आणि श्रद्धेने आवाज देतात. असं असलं तरी काही भाविक स्वामी समर्थांना स्वामी आई अशी देखील हाक मारतात. अनेक भक्तांच्या घरात स्वामींंचा फोटो हा देवीच्या रुपातला देखील दिसतो. स्वामींच्या देवी रुपाची देखील एक कथा सांगितली जाते, काय आहे ही कथा जाणून घेऊयात.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांना दत्तगुरुंचे तिसरे अवतार मानले जातात. अनेकांच्या घरी स्वमींचा देवीच्या अवतारातील फोटो दिसतो. तर झालं असं की, एकदा स्वामी महाराज, बाळप्पा महाराज आणि सुमारे 100 गावकरी हे कोनाळी गावच्या जंगलातून प्रवास करत होते. पायी प्रवास असल्याने संध्याकाळ झाली तरी अजून बराच प्रवास बाकी होता. दिवसभर चालून सगळ्यांना भूक लागली होती. पायपीट करुन शरीर थकलं होतं. भूकेने व्याकूळ झालेल्या भक्तांची अवस्था स्वामींना दिसली. त्यावेळी स्वामींनी भक्तांना सांगितलं की, बाळांनो आज तुम्हाला जेवायला वाढायला साक्षात अन्नपूर्णा देवी उपस्थित असणार आहे. स्वामींचे हे शब्द ऐकून सगळ्यांनी डोळे मोठे केले. स्वामींच्या बोलण्यावर कय व्यक्त व्हावंं हे कोणालाच काही कळत नव्हतं.
स्वामींच्या मागे त्यांचे 100 भक्त पायी प्रवास निरंतर करत होते. संध्याकाळी मग काही वेळाने रात्र झाली. आता मात्र त्या 100 गावकऱ्यांना एक पाऊल पुढे टाकणं देखील अशक्य वाटू लागलं. पण म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी. अगदील तसंच काहीसं झालं. भक्तांना स्वामी म्हणाले त्या पलिकडच्या घरात अन्नपूर्णा देवी तुमची वाट पाहत आहे. भक्तांनी स्वामींच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. स्वामींनी सांगितल्या प्रमाणे भक्तगण त्या घरात गेले. आणि आश्चर्यचकित झाले. घरात पाहतात तर काय? एक सुवासिनी स्त्रीचं दर्शन त्यांना झालं. त्या स्त्रिच्या डोळ्यात कारुण्य दिसत होतं. ही कोणी साधी स्त्री नाही ही नक्कीच देवीचा अंश आहे हे भुकेने व्याकूळ झालेल्या भक्तांनी ओळखलं होतं.
या सुवासिनी स्त्रीने त्या भक्तांचं आदराने स्वागत केलं आणि त्यांना जेवू घातलं. या 100 जणांच्या जेवणाची तिने आधीच सोय करुन ठेवली होती. तिच्या हातचं जेवण करुन भक्त तृप्त झाले. पोटभर जेवण केलेल्या त्या भक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. त्यांनंतर स्वामींना भक्तांनी विचारलं की ही स्त्री कोण होती. त्यावर स्वामी म्हणाले की, ती दुसरी तिसरी कोणी नसून माता अन्नपूर्णा देवी होती. भूकेने व्याकूळ झालेल्या तुम्हाला जेवू घालण्यासाठी ती माझ्यात रुपातून प्रकट झाली होती. जशी आई आपल्या लेकराला भूकेने व्याकूळ झालेलं पाहून कासावीस होते तेच प्रेम, तेच वात्सल्य आणि तेच मातृत्व स्वामींचं त्यांच्या भक्तांसाठी आहे. स्वामी आपल्या भक्तांची आईच्या मायेने काळजी घेतात. चुकल्यावर दटावतात तसंच अडचणीत असाताना सावरतात देखील म्हणूनच स्वामींना आईचा दर्जा त्यांचे भक्त देतात. आणि म्हणूनच स्वामींना स्वामी आई असं देखील म्हटलं जातं.