Breast cancer awareness among women during navaratri
प्रिती माने : नवरात्रीच्या निमित्ताने आपण स्त्रियांविषयीच्या अनेक समस्या आणि समाजातील त्यांच्याबद्दल असणारे मत, त्यांच्यासोबत होणारा दुजाभाव आणि त्यांच्या भावना अशा अनेक गोष्टींना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता अशा विषयावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याची चर्चा अनेकदा होतच नाही. आणि तो विषय म्हणजे आपले आरोग्य. स्त्री चूल मूल आणि संसाराच्या गाड्यामध्ये इतकी अडकून गेली आहे, की ती यामुळे आपली स्वतःची काळजी घेणंच विसरुन गेली आहे. तिच्या खांद्यावर घराचा, मुलांचा आणि संसाराचा भार असल्यामुळे तिला स्वतःसाठी उसंतच मिळत नाही. जॉब करणारी स्त्री असेल तर या जबाबदारी कमी तर होत नाहीच उलट त्यामध्ये आणखी वाढ होते. स्त्री गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो…तिचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. भारतातील अनेक स्त्रियांना एक गंभीर आजाराने विळखा घातला आहे तो म्हणजे कॅन्सर.
छोट्या मोठ्या दुखण्यांना नजरेआड करणारी स्त्री कधी शेवटच्या कॅन्सर स्टेजपर्यंत पोहचते ही तिचे तिलाच लक्षात येत नाही. भारतातील स्त्रियांमध्ये कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक 10 हजार महिलांमागे 10 महिलांना कॅन्सरचे निदान होत आहे. ही आकडेवारी अत्यंत गंभीर असून चिंताजनक परिस्थिती आहे. स्त्रीमध्ये गर्भाशयाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, एंडोमेट्रियल कर्करोग, गर्भाशयाचा सारकोमा, योनिमार्गाचा कर्करोग आणि व्हल्व्हर कर्करोग याचे सर्वाधिक प्रमाण आहे. हे सर्व कर्करोग महिलांच्या प्रजनन शक्तीवर थेट मात करतात. यामुळे महिलांच्या सर्जनशक्तीवर मोठा फरक पडतो. महिलांना कर्करोग झाला आहे हे लवकरच लक्षात येत नाही. त्यामुळे अगदी शेवटच्या स्टेजमध्ये असल्यावर याचे निदान होते. आणि महिलांना कठीण काळाला सामोरे जावे लागते.
स्तन, फुफ्फुस, कोलोरेक्टल, त्वचा आणि गर्भाशयाचे कर्करोग महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्यामुळे महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक आठ महिलांपैकी एकीला स्तनाचा कर्करोग होतो. कर्करोगामध्ये मृत्यू होणाऱ्या 14% महिलांना हा रोग होतो. महिलांची कर्करोगाबाबत समोर येणारी ही आकडेवारी नक्कीच धक्कादायक आहे. संसारामध्ये आणि जबाबदाऱ्यामध्ये अडकलेल्या महिलेला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. तो वेळ काढावा असे देखील तिला वाटत नाही. यामुळे तिची खूप मोठी हानी होत आहे. ही हानी शारिरीक असून यामुळे भारतात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
सध्याची जीवनशैली ही धावपळीची आणि धकाधकीची आहे. नवरात्रीमध्ये महिलांचा गौरव आणि सन्मान केला जात आहे. मात्र त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त महत्त्वाचे नाही तर ती काळाची गरज आहे. महिलांनी इतर गोष्टींबरोबरच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आहे. ठराविक काळाने चाचण्या करुन घेणे आणि स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे. मासिक पाळीमध्य बदल झाल्यास किंवा त्यासंबंधीत त्रास असल्यास घरी उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे. तसेच घरातील इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घेणे आणि योग्य, सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. यंदाच्या नवरात्रीमध्ये महिलांनी स्वतःच्या आरोग्याचा काळजी निर्धार केला तरी कर्करोग सारख्या वाळवी रोखण्यामध्ये आपल्या देशाला यश नक्कीच मिळेल.