chatushrungi Devi Temple navaratri 2024
प्रिती माने : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. स्त्री शक्तीचा गजर आणि जागर या नऊ दिवसांमध्ये केला जातो. पुण्यामध्ये आदिशक्तीची अनेक मंदिरं आहे. त्यातील आपले वेगळेपण जपणारे मंदिरं म्हणजे चतुःशृंगी मंदिर. पुणे विद्यापीठाजवळ सेनापती बापट रोडवर असलेले हे मंदिर पुण्यातील देवीच्या महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. नवरात्री उत्सवामध्ये भक्तांची मोठी गर्दी होणाऱ्या या चतुःशृंगी मंदिराचा परिसर अत्यंत देखणा आहे. लाल मातीचे टेकडीवरील हे मंदिर 350 वर्षांपेक्षा अधिक जुने आहे.
वणीची सप्तःशृंगी आणि पुण्याची चतुःशृंगी देवी भक्तगणांमध्ये लोकप्रिय आहे. देवीच्या या नावाला खास अर्थ आहे. चतुःशृंगी या शब्दाची उत्पत्ती चट्टू या शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ चार शिखरे असलेला टेकडी असा होता. हे चतुःशृंगी देवीचे मंदिर उंच अशा शिखरावर असून त्याला चार टेकड्या आहेत. जवळपास 150 पायऱ्या चढून मंदिरामध्ये प्रवेश करता येतो. चतुःशृंगी मंदिरामध्ये देवीची नेत्रदीपक शेंदूरी मूर्ती आहे. चतुःशृंगी देवीला अंबरेश्वरी देवी असेही म्हटले जाते. चांदीच्या गाभाऱ्यामध्ये असणाऱ्या देवीचे रुप लोभसवाणे असून डोळे लक्षवेधी आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गणरायाची देखील छोटी मूर्ती आहे. नवरात्रीमध्ये मंदिराच्या आवारामध्ये जत्रा भरते.
पुण्यातील ही चतुःशृंगी देवी स्वयंभू अशी आहे. पेशवाईच्या काळापासून या देवीचे अस्तित्व आहे. पेशवे काळात एक दुर्लभ शेठ नावाचे सावकार होते. त्यांनी अगदी पेशव्यांनी देखील युद्धकाळामध्ये मदत केली होती. देवीचे निसिम्म भक्त असलेले दुर्लभ शेठ यांनी वणीच्या देवीची मनभावे सेवा केली. दर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पुण्याहून सप्तःशृंगी देवीची यात्रा केली. पण त्यांना वृद्धपकाळाने ही यात्रा खंडित करावी लागली, याचे दुःख त्यांच्या मनाला सलत होते. त्यानंतर देवीने साक्षात दुर्लभ शेठ यांच्या स्वप्नामध्ये येऊन संकेत दिला.
दुर्लभ शेठ यांच्या स्वप्नामध्ये देवीने त्यांना दृष्टांत दिला. एका जागेवर उत्खनन केले तर त्यामध्ये तांदळा स्वरूपाची मूर्ती सापडेल, त्याची पूजा करा, असे स्वप्न त्यांना पडले. उत्खनन केल्यानंतर त्या ठिकाणी खरंच देवीची मुखवटा असलेली मूर्ती सापडली. अशाप्रकारे पुण्यामध्ये चतुःशृंगी देवी अवतरली. आजही लाखो भक्तगण चतुःशृंगी देवीची मनोभावे पूजा करतात. मंदिराचा परिसर देखील निसर्गरम्य असून पुणे शहराच्या वेशीवर हे मंदिर असून देवी रक्षा करत असल्याची भावना श्रद्धाळूंमध्ये आहे. लाल रंगांचे दगडी बांधकाम असलेले हे पुण्यातील चतुःशृंगी देवी मंदिर देवीच्या भक्तांचे श्रद्धास्थान आहे. ज्यांना वणीला जाऊन सप्तःशृंगी देवीचे दर्शन घेता येत नाही तर भक्तीभावाने पुण्यातील चतुःशृंगी देवी पुढे नतमस्तक होतात.