
एअर इंडियाच्या एआय-१७१ विमानाला उड्डाणानंतर काही वेळातच अपघात झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी अहमदाबादमध्ये घडली. या भीषण दुर्घटनेत विमानातील २४२ प्रवाशांपैकी केवळ एक प्रवासी वाचला असून, उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला असून, देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विजय रुपाणी लंडनला आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघाले होते. अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच विमान कोसळले. घटनेनंतर बचावकार्यात लष्कर आणि स्थानिक यंत्रणांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र अपघात इतका भीषण होता की, बहुतांश प्रवाशांचे मृतदेह ओळखणे कठीण झाले आहे.
या अपघाताने देशातील भूतकाळातील काही मोठ्या विमान दुर्घटनांची आठवण ताजी झाली आहे, ज्यात अनेक दिग्गज नेत्यांनी आपला जीव गमावला होता.
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत ATS ची एन्ट्री; डीव्हीआर जप्त अन्…
संजय गांधी (१९८०)
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र आणि काँग्रेसचे उदयोन्मुख नेते संजय गांधी यांचे २३ जून १९८० रोजी दिल्लीतील सफदरजंग विमानतळाजवळ खाजगी विमान कोसळून निधन झाले. विमान उडवण्याची त्यांना विशेष आवड होती. अपघाताच्या वेळी ते एका नव्या विमानाची चाचणी घेत होते. या दुर्घटनेत पायलट सक्सेना यांचाही मृत्यू झाला. संजय गांधी यांना इंदिरा गांधींचे राजकीय वारसदार मानले जात असल्याने त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षात आणि देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली.
माधवराव सिंधिया (२००१)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचे ३० सप्टेंबर २००१ रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे विमान अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत सिंधियांसह सात जण मृत्युमुखी पडले. ग्वाल्हेरचे लोकसभा सदस्य असलेल्या सिंधिया यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला.
जी. एम. सी. बालयोगी (२००२)
तेव्हाचे लोकसभा अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते जी. एम. सी. बालयोगी यांचे ३ मार्च २००२ रोजी आंध्र प्रदेशातील काकीनाडा परिसरात हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले. या अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. बालयोगी हे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे निकटवर्तीय मानले जात होते.
वाय. एस. राजशेखर रेड्डी (२००९)
आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे २ सप्टेंबर २००९ रोजी रुद्रकोंडा टेकड्यांमध्ये हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले. या दुर्घटनेत रेड्डीसह चार जणांचा मृत्यू झाला. काँग्रेसचे लोकप्रिय नेते असलेल्या रेड्डी यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली.
IND Vs END : गोलंदाजी विभागावर भारतीय संघाचे असणार लक्ष; ‘या’ दोन गोलंदाजांमध्ये रंगणार स्पर्धा
दोरजी खांडू (२०११)
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे २०११ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. २००७ पासून ते मुख्यमंत्रीपदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनाने अरुणाचल प्रदेशचे राजकारण अकार्यक्षमतेच्या आणि अनिश्चिततेच्या छायेत गेले.
मधु मुदगल (२०१३)
८ डिसेंबर २०१३ रोजी उत्तराखंडमधील देहरादूनजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात काँग्रेस नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मधु मुदगल यांचे निधन झाले. या दुर्घटनेत मुदगल यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्या उत्तराखंडमधील मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानल्या जात होत्या.
जनरल बिपिन रावत (२०२१)
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचे ८ डिसेंबर २०२१ रोजी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे एमआय-१७ व्ही५ हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या दुर्घटनेत रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि ११ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात देशासाठी एक मोठा धक्का ठरला.
विजय रुपाणी (२०२५)
अहमदाबाद येथे २०२५ मध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २३० प्रवासी, दोन वैमानिक आणि १० क्रू मेंबर्स प्रवास करत होते. या दुर्घटनेत सर्वांचा मृत्यू झाला. रुपाणी यांचे निधन गुजरातच्या राजकारणासाठी एक मोठी हानी ठरली.