
Indira Gandhi Death Anniversary
Indira Gandhi Death Anniversery: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी सकाळी त्यांच्याच अंगरक्षकांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. पण इंदिरा गांधींना त्यांच्या हत्येची पूर्वकल्पना आली होती. त्यांच्या हत्येच्या एक दिवस आधी भुवनेश्वरमध्ये त्यांनी दिलेल्या भाषणातील शब्दांवरून, त्यांच्यावर हल्ला होऊन त्यांची हत्या केली जाऊ शकते, असे संकेत दिसून आले होते.
हत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच ३० ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींनी भुवनेश्वरमध्ये त्यांचे शेवटचे भाषण दिले. या भाषणात त्यांनी जे शब्द उच्चारले त्यावरून असे दिसून येते की त्यांच्यासोबत काहीतरी अनुचित घडणार आहे. यांची त्यांना जाणीव झाली होती. इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, “मी आज येथे आहे, पण उद्या मी येथे नसेन, जेव्हा मी जिवंत नसेल तेव्हा माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब भारताला अधिक बळकटी देईल.”
महत्त्वाची बाब म्हणजे, ३० ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींना एक भाषण देण्यात आले होते. जे पूर्णपणे असामान्य होते. त्यांचे भाषण त्यांच्या माहिती सल्लागार एच.वाय. शारदा यांनी लिहिले होते, परंतु इंदिरा गांधींनी जे भाषण दिले जे पूर्णपणे वेगळे होते. इंदिरा यांनी एच.वाय. शारदा यांचे लिहिलेले भाषण सोडून दिले आणि स्वतःहून बोलू लागल्या.
भाषण सुरू करताच त्यांना लिहून दिलेले भाषण सोडून त्या स्वत:हून बोलू लागल्या. ‘मी आज इथे आहे. उद्या मी इथे नसेन. मी जगेन की नाही याची मला पर्वा नाही. मी खूप आयुष्य जगले आहे आणि माझे संपूर्ण आयुष्य माझ्या लोकांची सेवा करण्यात घालवल्याचा मला अभिमान आहे.’ मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सेवा करत राहीन आणि जेव्हा मी मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब भारताला मजबूत करेल.
इंदिरा गांधींचे हे शब्द ऐकून सर्व काँग्रेस नेते स्तब्ध झाले. त्यांनी त्यांच्या भाषणात अशी विधाने का केली हे त्यावेळी कोणालाही समजले नाही. पण भुवनेश्वरहून परतल्यानंतर इंदिरा गांधींना रात्री नीट झोप लागली नाही, असे म्हटले जाते. माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे. सोनिया गांधी यांनी लिहिले आहे की, ३० ऑक्टोबर १९८४ च्या रात्री जेव्हा त्या दम्याचे औषध घेण्यासाठी उठल्या तेव्हा इंदिरा गांधी अजूनही जाग्या होत्या. रात्री काही त्रास झाला तर आपल्याला फोन करावा, असं इंदिरा गांधी यंनी सोनिया गांधींना सांगितले होते.
दुसऱ्या दिवशी, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता पंतप्रधान इंदिरा गांधी एका परदेशी शिष्टमंडळाला भेटण्यासाठी आपल्या निवासस्थानातून बाहेर पडल्या होत्या. त्या एका माहितीपटासाठी मुलाखत देणार होत्या. निवासस्थान सोडून थोडे अंतर चालल्यानंतर त्या सफदरजंग रोडवरील एका गेटपर्यंत पोहोचल्या, जे अकबर रोडला जोडलेले आहे.
गेटजवळ सब-इन्स्पेक्टर बेअंत सिंग आणि कॉन्स्टेबल सतवंत सिंग ड्युटीवर होते. दोघांनी हात जोडून पंतप्रधानांना अभिवादन केले. इंदिरा गांधींनीही त्यांचे अभिवादन स्वीकारले. त्याच क्षणी बेअंत सिंग यांनी अचानक आपली अधिकृत रिव्हॉल्व्हर काढून गोळीबार केला. गोळी लागल्याने इंदिरा गांधी जमिनीवर कोसळल्या. लगेचच सतवंत सिंग यांनी आपल्या स्टेन गनमधून सलग गोळीबार केला. त्यांच्या बंदुकीतील सर्व गोळ्या झाडल्यानंतर इंदिरा गांधी गंभीररीत्या जखमी झाल्या. त्यांना तात्काळ दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात हलवण्यात आले; परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.