
योगा कधी सुरू झाला (फोटो सौजन्य - iStock)
आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. योगाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या दिवसाची सुरुवात करण्यात आली. गेल्या काही काळापासून ही प्रथा जगभर लोकप्रिय झाली आहे. लोक त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी त्यांच्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करत आहेत. अशा परिस्थितीत योग दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र आज या लेखात आम्ही तुम्हाला योग आणि त्याच्या इतिहासाबद्दल काही मनोरंजक आणि न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.
योग म्हणजे काय?
योग- सूक्ष्म विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक शिस्त आहे, जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगण्याची कला आणि शास्त्र आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ‘योग’ शब्दाची उत्पत्ती संस्कृत ‘युज’ या शब्दापासून झाली आहे, ज्याचा अर्थ ‘जोडणे’ किंवा ‘एकत्र होणे’ असा होतो. योगशास्त्रानुसार, योग केल्याने आत्मा ईश्वराशी एकरूप होतो. तसंच मन हे शरीर आणि निसर्ग यांच्यात सुसंवाद घडवून आणते. जीवनातील सर्व अडचणींवर मात करून आत्मज्ञान प्राप्त करणे हा योगाचा मुख्य उद्देश आहे असे एकंदरीत आपण म्हणून शकतो.
योगाचा इतिहास (फोटो सौजन्य – iStock)
आजकाल योग खूप लोकप्रिय असला तरी, त्याचा इतिहास हा खूपच जुना आहे. असे मानले जाते की, योगाचा अभ्यासदेखील सभ्यतेच्या प्रारंभापासून सुरू झाला. योगाचा उगम हजारो वर्षांपूर्वीचा मानला जातो. योगा हा कोणत्याही धर्मापेक्षा जुना असल्याचे मानले जाते. योगविद्येत भगवान शिवाला प्रथम योगी किंवा आदियोगी म्हटले जाते.
हजारो वर्षांपूर्वी आदियोगींनी हिमालयातील कांतिसरोवर सरोवराच्या तीरावर सप्तऋषींना सखोल ज्ञान दिले आणि त्यानंतर या ऋषींनी योगाचे हे ज्ञान आशिया, मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेसह जगाच्या विविध भागात पसरवले असे सांगण्यात येते. योगाचा इतिहास जगाच्या विविध भागांत सापडला असला तरी त्याचे मूळ भारताशी जोडलेले आहे.
सिंधू संस्कृतीतील सील आणि जीवाश्म अवशेषांमध्येदेखील योग करत असलेल्या आकृत्या सापडल्या आहेत, जे प्राचीन भारतात योगाच्या अस्तित्वाचा पुरावा देतात. याशिवाय, देवीच्या मूर्तींची चिन्हे आणि शिक्के तंत्र योगाकडे निर्देश करतात. प्राचीन संस्कृतींव्यतिरिक्त, योगाची उपस्थिती लोक परंपरा, सिंधू संस्कृती, वैदिक आणि उपनिषद, बौद्ध आणि जैन परंपरा, महाभारत आणि रामायण महाकाव्ये, शैव आस्तिक परंपरा, वैष्णव आणि तांत्रिक परंपरांमध्येदेखील दिसून येते.
योग हे ‘सूर्यनमस्कार’शिवाय अपूर्ण आहे. योग आणि सूर्यनमस्कार हे परफेक्ट समीकरण आहे. मात्र त्याच्या उत्पत्तीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. वैदिक काळात सूर्याला खूप महत्त्व होते. यासाठी ‘सूर्यनमस्कार’ या प्रथेचा शोध लागला. जरी वेदपूर्व काळापासून योगाचा अभ्यास केला जात असला तरी, महान ऋषी महर्षी पतंजली यांनी आधुनिक योगाच्या पद्धती आणि त्याचा योग्य अर्थ यांना जन्म दिला. पतंजलीनंतर अनेक संत आणि योगगुरूंनी योगाचे जतन आणि विकास करण्यात मोठे योगदान दिले.
योगाचा आधुनिक काळ कधी सुरू झाला (फोटो सौजन्य – iStock)
युगानुयुगे योगाचा आधुनिक काळ हा १७०० ते १९०० इसवी सनाचा काळ मानला जातो. या काळात रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस, परमहंस योगानंद, विवेकानंद इत्यादी महान योगाचार्यांनी राजयोगाच्या विकासात योगदान दिले. तसेच, हा तो काळ होता जेव्हा वेदांत, भक्तियोग, नाथयोग किंवा हठयोग यांचाही विकास झाला.
योग करण्याचे फायदे (फोटो सौजन्य – iStock)
प्राचीन काळापासून लोकांना लाभदायक ठरणारा योग सध्या अनेक नामांकित योग संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे, खाजगी ट्रस्ट, सोसायटी इत्यादींमध्ये शिकवला जात आहे. अनेक योग चिकित्सालय, योगा थेरपी आणि प्रशिक्षण केंद्रे लोकांना त्याकडे आकर्षित करण्याच्या आणि सामाजिक कल्याणासाठी त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहेत. प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक महान योगगुरूंनी त्याचे जतन आणि संवर्धन केले आहे, ज्याचा लाभ सध्या जगभरातील कोट्यवधी लोक उपभोगत आहेत. योगामुळे आजही भरभराट होत आहे आणि दिवसेंदिवस यामध्ये वाढच होणार आहे.