Kargil Vijay Diwas: कारगिल युद्ध हे केवळ एक लष्करी संघर्ष नव्हते; ते भारताच्या सार्वभौमत्वाची, धोरणात्मक कौशल्याची आणि सैनिकांच्या अदम्य धैर्याची कठोर परीक्षा होती. मे १९९९ मध्ये पाकिस्तानी सैन्य व दहशतवाद्यांनी मिळून कारगिलच्या उंच शिखरांवर कब्जा केला, तेव्हा भारताला स्वतःच्या सीमेतच युद्धाचा सामना करावा लागला. घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी हाती घेतलेले “ऑपरेशन विजय” दोन महिन्यांहून अधिक काळ चालले आणि २६ जुलै १९९९ रोजी भारताने प्रत्येक शिखरावर तिरंगा फडकवत विजय घोषित केला.
या युद्धाने भारतीय सैन्याची ताकद आणि देशातील जनतेचा एकत्रित पाठिंबा जगासमोर सिद्ध केला, मात्र या यशासाठी मोठी किंमत चुकवावी लागली. शेकडो जवानांनी बलिदान दिले, अब्जावधी रुपयांचा खर्च झाला आणि मोठ्या प्रमाणात लष्करी साधनसंपत्तीचा वापर झाल्याचे बोलले जाते. पण कारगिल युद्ध हे भारतासाठी केवळ लष्करी आव्हान नव्हते तर आर्थिक परीक्षा देखील होती. आकडेवारीनुसार, या युद्धात भारताने अंदाजे ५ ते १० हजार कोटी रुपये खर्च केले. एकट्या भारतीय हवाई दलाने ३०० हून अधिक हवाई हल्ले केले ज्यात सुमारे २००० कोटी रुपये खर्च झाले. त्याच वेळी, सैन्याच्या जमिनीवरील कारवाईचा खर्च दररोज सुमारे १० ते १५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. काही अहवालांनुसार, कारगिल युद्धादरम्यान भारताला दररोज १४६० कोटी रुपयांपर्यंत खर्च सहन करावा लागला. असे असूनही, त्यावेळी भारताची मजबूत अर्थव्यवस्था, ३३.५ अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा आणि १० अब्ज डॉलर्सच्या संरक्षण बजेटमुळे या संकटाला तोंड देण्याची ताकद मिळाली.
आर्थिक नुकसानापेक्षा जास्त नुकसान भारताने आपले ५२७ शूर सैनिक गमावले. तर या युद्धात १३६३ हून अधिक सैनिक जखमी झाले. हे असे बलिदान आहे जे कोणत्याही किंमतीत तोलता येणार नाही. या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात, उंच शिखरे काबीज करताना, अनेक तुकड्यांनी प्रत्येक इंच जमिनीसाठी आपले प्राण धोक्यात घातले.
तर भारताच्या तुलनेत कारगिल युद्धात पाकिस्तानला भारतापेक्षा खूप जास्त लष्करी नुकसान सहन करावे लागले. काही अहवालांनुसार, या युद्धात सुमारे ३००० पाकिस्तानी सैनिक मृत्यूमुखी पडले. तर पाकिस्तानन जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानने ३५७ सैनिकांच्या मृत्युचा दावा केला होता. युद्धानंतर, जेव्हा भारतीय सैन्याने उंचावरील भाग पुन्हा ताब्यात घेतला, तेव्हा तेथे शेकडो पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आढळले. पाकिस्तानने त्यांना परत घेण्यासही नकार दिला होता. एवढेच नाही तर युद्धात पाकिस्तानच्या धोरणात्मक अपयशामुळे त्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमाही खराब झाली. लाहोर घोषणेच्या काही महिन्यांनंतर कारगिल घुसखोरी ही जगभरात विश्वासघात आणि युद्ध सुरू करण्याचा कट म्हणून पाहिली गेली.
त्या काळात भारताची अर्थव्यवस्था मजबूत होती. परकीय चलन साठाही $३३.५ अब्ज आणि संरक्षण बजेट $१० अब्ज इतके होते. पण पाकिस्तान मात्र हे युद्ध जास्त काळ लांबवण्याच्या स्थितीत नव्हता. त्यातच युद्धाच्या काळात पाकिस्तानचा रोजचा खर्च सुमारे ३७० कोटी रुपये होता जो भारताच्या तुलनेत खूपच कमी होता. त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरी परिणाम होऊ लागला होता. पण भारताची आर्थिक तयारी आणि राजकीय स्थिरतेमुळे भारतीय सैन्य या युद्धात ठाण मांडून उभे राहिले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दबाव लष्करी शक्ती आणि आर्थिक संकटामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली.
कारगिल युद्धामुळे भारतीय सैन्याच्या अनेक उणीवादेखील उघडकीस आल्या. कारगिल युद्धाच्या वेळी शस्त्रास्त्र शोधणारे रडार उपलब्ध नसल्यामुळे अनेक सैनिक शहीद झाले. या कमतरतेची जाणीव झाल्यानंतर ‘स्वाती’ रडार प्रणाली सेवेत समाविष्ट करण्यात आली, जी शत्रूच्या तोफखान्याच्या स्थानांचा अचूक शोध घेते. त्याच काळात बुलेटप्रूफ जॅकेट, नाईट व्हिजन उपकरणे आणि मूलभूत सुविधांचा अभावही प्रकर्षाने जाणवला होता, जो नंतर भरून काढण्यात आला. सध्या कारगिलसारख्या दुर्गम भागांमध्ये रस्ते व बोगदे बांधण्यात आले आहेत, ज्यामुळे सैन्य व लष्करी उपकरणांची वाहतूक अधिक सुलभ झाली आहे.