मुंबईतील ‘कृष्ण मोहीनी’ची डोळे पाणावणारी कहाणी
एक ट्रान्सजेंडर जिने गरिबी, अत्याचार आणि बदनामी सहन केली आणि स्वतःच्या बळावर करिअर बनवले. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये नृत्य करून आपले नाव कमावले आणि आपल्या टॅलेंटवर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली. लोकलमध्ये डान्स करून कृष्णची आज कृष्ण मोहीनी ओळख निर्माण झाली. या कृष्ण मोहीनीची कहाणी ऐकल्यानंतर तुम्हालाही अश्रू अनावर होतील…
मुंबईची लाइफलाइन असणाऱ्या लोकलने रोज लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे ही लोकल ट्रेन आता मुंबईकरांच्या रोजच्या जगण्याचा एक भाग झाली आहे. आज अनेकांचे जगणे या लोकल ट्रेनवर अवलंबून आहे. या प्रवासादरम्यान अनेकदा शिवीगाळ, हाणामारी, धक्काबुक्कीच्या घटना घडतात, ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होतात. पण याचप्रवासादरम्यान अनेकदा अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्याने सर्व थकवा दूर होतो. चेहऱ्यावर स्मित फुलतं. अशीच एक स्मित हास्य म्हणजे लोकलची कृष्ण मोहीनी… अशी एक तृतीयपंथी जी टाळ्या वाजवून नाही, तर चक्क आपली कला सादर करून सन्मानाने पैसे कमावताना दिसतेय. मुंबई लोकलमधील डान्समुळे कृष्ण मोहीनीला एक वेगळीच ओळख मिळाली, अशी माहिती कृष्ण मोहीनी यांनी नवराष्ट्र नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात दिली.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये सोशल मीडियावर कृष्ण मोहीनी म्हणून प्रसिद्ध मिळालेल्या तृतीयपंथी यांची कहाणी खूप खास आहे. सात वर्षांची असताना कुटुंबाने घराबाहेर काढले. जेव्हा बालपणात खेळायचं वय होतं, त्यावेळी पोटाची भूक भागवण्यासाठी वणवण करावी लागली. आम्ही जुळे भाऊ होतो, पण वडिलांनी मात्र जुळ्या भावालासोबत ठेवलं अन् मला घराबाहेर काढलं. मला सात वर्षाची असताना दिल्लीतील रेल्वे फलाटावरून सोडून दिलं. त्यावेळी फुल विकणाऱ्या एका महिलेने मला साथ दिली. कधीकधी काम केल्यानंतरच अन्नाचे घास मिळायचे. हळूहळू काही वर्षांनी समाजातील लोकांनी त्यांचे जगणे दुश्वार केले कारण त्या ट्रान्सजेंडर होत्या.
डान्स शिकण्याची कधी संधी मिळाली नाही, पण तीच ओळख महाराष्ट्रामुळे मिळाली. देह विकला, धंदा केला, फूलं विकली , सर्कसमध्ये डान्स केला, बारमध्ये पण डान्स केला, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत डान्सची कला दाखवली, पण महाराष्ट्रामध्येच कलेचा आदर झाला. महाराष्ट्रामध्ये नवीन आयुष्य जगण्याची संधी मिळाली, अशी माहिती कृष्ण मोहीनी यांनी दिली.
लोकलमध्ये एका दिव्यांगला पाहून जाणवलं, त्या व्यक्तीला हात नाही म्हणून भीक मागतो… पण देवाच्या कृपाने माझ्याबाबती तसं नाही, मग मी का टाळी वाजवून भीक मागायची..त्यावेळी ठरवलं, आता टाळी वाजवून नाही तर आपल्यासाठी कौतुकाची टाळी वाजली पाहिजे, असं काही तरी काम करणार.. तेव्हापासून लोकलमध्ये कला सादर करून प्रवाशांकडून कौतुकाची थाप मिळवली.
नवराष्ट्र नवदुर्गा या मुलाखतीमध्ये कृष्ण मोहीनी यांना प्रश्न विचारण्यात आला, पुनर्जन्म घेतल्यानंतर तुम्ही स्त्री म्हणून जन्म घ्याल की पुरुष म्हणून ? यावर त्यांनी तृतीयपंथीच म्हणून जन्म येणार असं सांगितलं.
कृष्ण मोहीनी धावत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात सुंदर नृत्यकला सादर करते. त्यानंतर प्रवाशांसमोर टाळ्या वाजवत हात न पसरता सन्मानाने पैसा कमवते. विशेष म्हणजे तिची आकर्षक नृत्यकला पाहून महिला प्रवासीखील तितक्याच आनंदाने तिला पैसे देतात. ‘इन आँखों की मस्ती’ गाण्यावर अतिशय तालात नाचतेय. त्यावेळी नाचताना तिच्या चेहऱ्यावरील प्रत्येक हावभाव पाहण्यासारखा आहे. चर्चगेट-भाईंदर या लोकल प्रवासादरम्यान डान्स करते. यावेळी फक्त तिने आपली नृत्यकलाच सादर केली नाही. तिने त्यानंतर लोकांसमोर तिचे सुंदर विचारदेखील मांडले. मला भीक मागायची नाही, मला कठोर परिश्रम करायचे आहेत आणि सन्मानाने कमवायचे आहे. तिचे हे विचार ऐकून प्रवासीदेखील तिला समर्थन देतात. त्यानंतर ती डब्यात फिरते आणि लोक तिला स्वत:हून पैसे देतात. तिचा एकूणच सुंदर गेटअप पाहण्यासारखा असतो.