National Brother's Day Celebrating the bond between brothers and sisters
National Brother’s Day : बंधू हा शब्द उच्चारताच डोळ्यांपुढे येतो तो एक असा चेहरा जो संकटाच्या क्षणी नेहमी आपल्या पाठीशी असतो. आपल्या जीवनातील अनेक वळणांवर मार्गदर्शक ठरणारा भाऊ म्हणजे बहिणींसाठी आधारस्तंभ असतो. याच बंधुत्वाच्या नात्याला समर्पित असलेला राष्ट्रीय बंधू दिन (National Brother’s Day) दरवर्षी २४ मे रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे भावाला आपल्या प्रेमाची आणि कृतज्ञतेची जाणीव करून देणे. आपल्या आयुष्यात त्याच्या असण्याने जी भरभराट होते, त्याच्या अष्टपैलू भूमिकांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
राष्ट्रीय बंधू दिनाची सुरुवात २००५ साली अमेरिकेत झाली. अलाबामा येथील सी. डॅनियल रोड्स या लेखक आणि कलाकाराने या दिवसाची संकल्पना मांडली. त्यांच्या मते, भावांनी समाजासाठी आणि कुटुंबासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांचे कौतुक करणे आवश्यक आहे. तेव्हापासून २४ मे हा दिवस ‘ब्रदर्स डे’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
सुरुवातीला अमेरिकापुरता मर्यादित असलेला हा सण आज अनेक देशांमध्ये, विशेषतः भारत, रशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि जर्मनीतही साजरा केला जातो. अनेक वेळा लोक १० एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय भावंड दिनाला बंधू दिन समजून गोंधळ करतात. पण या दोन्ही दिवसांचा उद्देश वेगळा आहे. भावंड दिन हा भाऊ-बहिणींना समर्पित असून, बंधू दिन केवळ भावांच्या नात्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची तिहेरी जबाबदारी; रशियाची लज्जास्पद भूमिका आणि चीनचा पाकिस्तानला पडद्यामागून पूर्ण पाठिंबा
भाऊ म्हणजे केवळ रक्ताचे नाते नव्हे. तो मित्र, सल्लागार, मार्गदर्शक आणि आनंदाचा भागीदार असतो. अनेक वेळा जीवनात चुलत भाऊ, मित्र, नातेवाईक किंवा अगदी एखादा जवळचा सहकारीही भावासारखा वाटतो. जो संकटाच्या वेळी पाठीशी उभा राहतो, आपल्या भावना समजतो आणि आपल्या यशात आनंद मानतो तोच खरा भाऊ. या दिवशी अनेकजण आपल्या भावाला भेटवस्तू देतात, एखादी खास वेळ घालवतात, त्याला पत्र लिहतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करतात. यामागील हेतू एकच भावाला हा दिवस खास वाटावा.
राष्ट्रीय बंधू दिन २०२४ : जाणून घ्या या खास दिवसामागचा इतिहास आणि महत्त्व ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात किमान एक असा भाऊ असावा, ज्याच्यावर तो पूर्ण विश्वास ठेवू शकतो. भावासोबत जीवनातील चढ-उतार शेअर करता येतात, संकटाच्या वेळी आधार घेता येतो आणि आनंदाच्या क्षणी हास्यविनोदात रममाण होता येते. बंधुत्व हे केवळ जन्माने जुळलेले नसते, तर ते अनुभवांनी घडते. भावाच्या रूपाने जीवनाला मिळणारा आधार हा अनेक नात्यांहून श्रेष्ठ ठरतो. त्यामुळे राष्ट्रीय बंधू दिन ही केवळ औपचारिकता न राहता, आपल्या भावाशी असलेल्या नात्याचे बंध अधिक दृढ करणारी एक सुंदर संधी आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जर हार्वर्डमधील राहायचे असेल तर! भारतीयांसह परदेशी विद्यार्थ्यांना 72 तासांच्या आत पूर्ण कराव्या लागणार ‘या’ 6 अटी
आजच्या धकाधकीच्या युगात अनेक वेळा आपण आपल्या जवळच्या माणसांना वेळ देऊ शकत नाही. राष्ट्रीय बंधू दिन ही संधी आहे आपल्या भावाशी मनमोकळा संवाद साधण्याची, त्याच्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करण्याची. आजच्या या २४ मेच्या दिवशी, आपल्या भावाला एक फोन करा, एक मिठी द्या किंवा एक पत्र लिहा. त्याला सांगा की, तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे – कारण भाऊ हा आयुष्यातला तो आधार आहे जो अनेक वेळा शब्दांशिवाय आपल्यासाठी सर्वस्व अर्पण करतो.