Navratri special article on women respect
प्रिती माने – देशभरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. बंगालमधील नवरात्र ही परंपरेचा सांगड घालणारी आहे तर गुजरातमधील नवरात्र ही गरबा दांडियामधून उत्सवाचा जल्लोष दाखवणारी आहे. महाराष्ट्रातील शक्तीपीठ आदिशक्तीची रुप दाखवणारी आहे. त्या त्या राज्यांची नवरात्र ही वेगळेपणा जपणारी आहे. यामध्ये एका गोष्टीचे मात्र साम्य आहे, ती म्हणजे आराधना. स्त्री शक्तीची..भक्तीची…तिच्या प्रीतीची ही उपासना कृतज्ञता दर्शवणारी आहे. सर्जनशीलता आणि उत्पत्तीचे स्थान असलेल्या ‘ती’ला सन्मान देण्याचा हा एक उत्सव आहे. मात्र या नऊ दिवसांच्या उत्सवानंतर काय? त्यानंतर ‘ती’चा हा सन्मान ही कृतज्ञता जाते कुठे? आजही तिच्याबाबत असणारी दुय्यम स्थानाची भावना समाजामध्ये रेंगाळते आहे. आणि ही फक्त रेंगाळत नाही तर वाळवीसारखी समाजाला पोखरते आहे.
आपला समाज हा पुरुषप्रधान मानला जातो. पण मी ही सृष्टी सृजनशील स्त्रीच्या हाती आहे, असे मानते. कारण ही स्त्रीरुपी धरणी आणि प्रत्येक स्त्री एक स्वशक्ती सांभाळून अस्तित्व दाखवून देते. तिच्यामध्ये असणारी सृजनशीलता आणि सहनशक्ती हे बळ आपसूकच तिला ‘आदिशक्ती’ बनवते. तिच्या उदरी ती चुका सामावून घेते. पण तिला सहनशक्ती आजच्या या पुरुषप्रधान समाजात आणखीच वाढवावी लागते आहे. बळकट करावी लागते आहे. याचे कारण म्हणजे तिला दिली जाणारी वागणूक…दुय्यमता आणि अस्पृश्यता.
देवघरांमध्ये लक्ष्मीला अगदी कुबेराच्या शेजारी बसवून पुजले जाते. घरच्या लक्ष्मीला मात्र घरात निर्णयाचा, मतं मांडण्याचा अधिकार सुद्धा दिला जात नाही. तिला मत मांडू दिले जात नाही आणि मांडलेच तर ग्राह्य धरले जात नाही. घरचा उंबरठा दिला लक्ष्मणरेषा वाटू लागतो. त्या बाहेरचे जग तिला काळ्या पोकळीप्रमाणे अंधारे वाटू लागते. आणि घरातही तिची घसुमट होते. यामुळे तिच्या मनात पोकळी निर्माण होते ती कायमची. हा वारसा मागील अनेक पिढ्यानंपिढ्या पुढे अजाणता दिला जातो आहे. तिची इच्छाशक्ती मारुन एकप्रकारे तिचे पंख छाटले जात आहेत. तिला मत मांडून न दिल्याने एकप्रकारे तिची वाचा काढून घेतली जाते आहे. तिला निर्णय न घेऊ दिल्यामुळे तिच्या सद्सद्विवेकबुद्धीवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तिच्याबाबत असणारी विचारांनी असणारी अस्पृश्यता आजही आपल्याला दररोज अगदी सहज दिसून येते. तिला याची जाणीव देखील अनेकदा नसते इतके ते तिच्या अंगवळणी पडले आहे.
आजही बंधनं मोडून आणि घराचे उंबरठे ओलांडून आपले विश्व निर्माण करणाऱ्या अनेक स्त्रिया आहेत. पण समाजामध्ये आजही स्त्रिया सुरक्षित नाही. ती लहान तान्हुली असो…किशोरवयीन असो…तरुणी असो…आई असो…आज्जी असो…नराधमांसमोर कोणीही सुरक्षित नाही. घर असो वा दार असो…शाळा असो वा ऑफिस असो… कुठेही ती सुरक्षित नाही. आजच्या जगामध्ये आपाल्यालाच दुर्गा म्हणून उभे राहावे लागणार आहे. व्यभिचारी राक्षसाला ठेचून स्वरक्षाणार्थ शक्तीचे रुप घ्यावे लागणार आहे. यासाठी स्त्रीयांनी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे.