Who was the first chief guest of Republic Day
76 वा प्रजासत्ताक दिन 2025: 26 जानेवारी रोजी साजरा होणार प्रजासत्ताक दिवस हा आपल्या भारत देशाच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. हा दिवस दरवर्षी देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भारतीय नागरिक आपल्या देशाप्रती असलेली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करतात. या दिवशी आपल्या देशाची राज्यघटना अमलांत आली आणि भारताला स्वतंत्र, लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आले. या विशेष प्रसंगी, भारत प्रत्येकवर्षी कोणत्यातरी देशाच्या राष्ट्राध्यक्षाला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करतो. या परंपरेचा इतिहास आणि त्यामागील उद्देश समजून घेणे महत्त्वाचे आहे.
मुख्य अतिथी आमंत्रित करण्याची परंपरा का सुरू झाली?
भारताने 26 जानेवारी 1950 रोजी प्रथमच प्रजासत्ताक दिन साजरा केला. हा दिवस भारताच्या इतिहासातील एक अभिमानास्पद क्षण होता. याच दिवशी देशाने ब्रिटिश सत्तेपासून पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करून नवे संविधान स्वीकारले. या ऐतिहासिक घटनेला अधिक विशेष करण्यासाठी आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाला सुदृढ करण्यासाठी, दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करून संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘हे’ आहेत 26 जानेवारीला तिरंगा फडकवण्यासाठी खास नियम, जाणून घ्या नियम तोडल्यास काय आहे शिक्षा?
परंपरेमागील उद्देश
या परंपरेमागील उद्देश भारताच्या परराष्ट्र धोरणाचे महत्त्व अधोरेखित करणे, इतर देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे आणि विविध देशांसमोर भारताची अखंडता व सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करणे हा होता. ही परंपरा आजही भारताच्या राष्ट्रीय उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. विशेष म्हणजे या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ प्रदान करण्यात येतो.
पहिले प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी
26 जानेवारी 1950 रोजी पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी जवाहरलाल नेहरु भारताचे पंतप्रधान होते. हा ऐतिहासिक सोहळा दिल्लीतील इरविन एम्फीथिएटर म्हणजे सध्याचे मेजर ध्यानचंद स्टेडियम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्यात 3,000 भारतीय सैन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता आणि 100 हून अधिक विमाने आकाशात उड्डाण करत होती. विशेष म्हणजे, प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिली औपचारिक परेड 1950 मध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
कोणत्या आधारावर ठरवले जातात प्रमुख पाहुणे?
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यापूर्वी कोणत्या देशाशी संबंध अधिक सुधारता येतील, तसेच देश व्यापार संरक्षण आणि विज्ञान या क्षेत्रात सहकार्य कोणता देश करु शकेल. कोणता देशामुळे परदेशी संबंधांना चालना मिळेल. जुने संबंध आणखी कसे सुधारतील या आधारे दोन्ही देशांच्या संमंती द्वारे प्रमुख पाहुणे ठरवण्यात येतात.
परंपरेचे आजचे महत्त्व
प्रजासत्ताक दिनाला मुख्य अतिथी आमंत्रित करण्याची परंपरा भारताच्या परराष्ट्र संबंधांची ओळख आहे. यावर्षी, 2025 मध्ये, इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना या ऐतिहासिक प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या परंपरेमुळे भारताचा जगातील एक महत्त्वाचा देश म्हणून दबदबा कायम राहतो आणि भारताची ऐतिहासिक व सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित होते.