Women in Science made history but men took the credit
इतिहास साक्ष आहे की अनेक महिला शास्त्रज्ञांनी महत्त्वाचे शोध लावले, परंतु त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही. पुरुष सहकाऱ्यांनी किंवा समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही आणि त्यांच्या संशोधनाचे श्रेय इतरांकडे गेले. विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रात महिलांनी मोठे योगदान दिले आहे, तरीही त्यांचे नाव इतिहासाच्या पानांमध्ये फारसे आढळत नाही. आजही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांना समान संधी आणि श्रेय मिळत नाही. अशाच काही स्त्री शास्त्रज्ञांची नावे आणि त्यांच्या संशोधनाची कहाणी समजून घेऊया, ज्यांच्या कार्याचा मोठा प्रभाव जगावर पडला, पण त्यांचे श्रेय मात्र इतरांनी घेतले.
हेडी लामार ही हॉलिवूड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती, परंतु ती एक कुशाग्र वैज्ञानिक देखील होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, तिने जॉर्ज अँथेल यांच्यासोबत फ्रिक्वेन्सी हॉपिंग तंत्रज्ञान विकसित केले, ज्यामुळे सैन्य संप्रेषण अधिक सुरक्षित करता येत होते. दुर्दैवाने, त्यावेळी अमेरिकन नौदलाने तिच्या संशोधनाकडे दुर्लक्ष केले. कालांतराने, याच तंत्रज्ञानावर आधारित ब्लूटूथ, वाय-फाय आणि GPS प्रणाली विकसित झाली. अखेर 2000 मध्ये, तिला तिच्या शोधाबद्दल इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडेशन पुरस्कार मिळाला, परंतु तोपर्यंत तिचे महत्त्व पूर्णतः दुर्लक्षित झाले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मेरा इंतकाम देखेगी… 1200 च्या स्पीडने गाडी चालवत गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचला आणि लावली आग
1940 च्या दशकात, बाळांसाठी वापरण्यास सोपे असे डायपर नव्हते. फक्त कापडी डायपर प्रचलित होते, जे वारंवार धुवावे लागत. मॅरियन डोनोव्हन हिने पहिले जलरोधक डायपर तयार केले, ज्यामुळे बाळांचे आरोग्य सुधारण्यास मदत झाली. सुरुवातीला तिच्या संशोधनाला मोठ्या कंपन्यांनी महत्त्व दिले नाही. मात्र, नंतर डिस्पोजेबल डायपरच्या उत्पादनाने जागतिक बाजारपेठ काबीज केली, परंतु या शोधाचे श्रेय तिला मिळाले नाही.
1951 मध्ये, ब्रिटीश शास्त्रज्ञ रोझालिंड फ्रँकलिन हिने डीएनए संरचनेवर संशोधन केले आणि “फोटो 51” नावाचा महत्त्वाचा पुरावा तयार केला. या प्रतिमेतून डीएनए दुहेरी हेलिक्सच्या स्वरूपात असल्याचे सिद्ध झाले. मात्र, तिच्या सहकाऱ्यांनी तिच्या संशोधनाचा गैरफायदा घेतला. जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी या माहितीनुसार निष्कर्ष काढले आणि 1962 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले, पण रोझालिंड फ्रँकलिनचे नाव कुठेही घेतले गेले नाही.
मार्गारेट नाइट हिने 1868 मध्ये चौकोनी तळाच्या कागदी पिशव्या तयार करणारे यंत्र विकसित केले. तिच्या कल्पकतेमुळे पिशव्या अधिक मजबूत आणि उपयोगी झाल्या. मात्र, चार्ल्स अन्नान नावाच्या व्यक्तीने तिच्या डिझाइनची नक्कल करून पेटंट दाखल करण्याचा प्रयत्न केला. मार्गारेटने त्याच्यावर खटला दाखल केला आणि अखेर तिला 1871 मध्ये पेटंट मिळाले.
ENIAC हा जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक होता, जो 1946 मध्ये विकसित करण्यात आला. या संगणकाचे प्रोग्रामिंग आणि ऑपरेशन सहा महिला प्रोग्रामर्सने केले, परंतु त्यांचे योगदान मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित करण्यात आले. संगणक क्षेत्रातील यशस्वीतेचे श्रेय मुख्यतः जॉन माउचली यांना दिले गेले, पण प्रत्यक्षात संगणकाच्या विकासामध्ये महिलांचे मोठे योगदान होते.
1903 मध्ये, मेरी अँडरसन हिने विंडशील्ड वायपरचे पेटंट घेतले, जे वाहनचालकांसाठी अत्यंत उपयुक्त होते. मात्र, कंपन्यांनी तिच्या संशोधनाकडे दुर्लक्ष केले. पुढे 1950-60 च्या दशकात या शोधाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला, परंतु तोपर्यंत अँडरसनचे पेटंट कालबाह्य झाले होते आणि तिच्या नावाचा कुठेही उल्लेख केला गेला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगातील सर्वात मोठी इमारत बांधत आहे सौदी अरेबिया; क्राऊन प्रिन्सच्या ‘मुकाब’ योजनेमुळे गोंधळ
या महिलांच्या शोधामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती झाली, तरीही त्यांना योग्य मान्यता मिळाली नाही. विज्ञानाच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत, जिथे स्त्रियांनी केलेल्या संशोधनाचे श्रेय पुरुषांनी घेतले. आजही विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात महिलांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या कार्याची जाणीव सर्वांना व्हावी, यासाठी अशा विस्मृतीत गेलेल्या महिला शास्त्रज्ञांची नावे अधिक उजाळा मिळणे गरजेचे आहे.