World Lizard Day You might not know these things about lizards
World Lizard Day 2025 : दरवर्षी १४ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक सरडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगभरातील सरपटणाऱ्या प्राणीप्रेमींसाठी हा दिवस फक्त कॅलेंडरवरील तारीख नसून, हा निसर्गातील एका अनोख्या जीवाच्या संरक्षणासाठी दिलेला महत्त्वपूर्ण संदेश असतो. लहानशा बागेत दिसणाऱ्या घरगुती सरड्यापासून ते दूरवरच्या जंगलातील भव्य कोमोडो ड्रॅगनपर्यंत या प्राण्यांचा निसर्गातील समतोल राखण्यात मोलाचा वाटा असतो. पण अनेक प्रजाती आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या निमित्ताने, आपण सरड्यांबद्दलच्या अशा पाच आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी जाणून घेऊया, ज्या बहुतेकांना माहित नसतात.
तुम्हाला माहित आहे का, जगात सुमारे शंभर प्रजाती अशा आहेत ज्या पाय नसलेल्या सरड्यांमध्ये मोडतात? ते जमिनीखाली राहतात, मातीतून हळूहळू रांगतात आणि दूरून पाहता सापांसारखे वाटतात. मात्र, त्यांच्या शरीररचनेत काही महत्त्वाचे फरक आहेत त्यांचे कान लहान असतात, लांब शेपटी असते आणि ते प्रामुख्याने कीटकांची शिकार करतात. तर साप संपूर्ण भक्ष्य गिळतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RMG Sector Collapse : भारताशी पंगा घेण्याची युनूसला मोजावी लागली मोठी किंमत; दीड लाख बांगलादेशी उतरले रस्त्यावर
जगातील बहुतेक सरडे पोहू शकतात. त्यापैकी हिरवा बॅसिलिस्क हा सरडा पाण्यावर धावू शकतो, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल! काही सरडे पाण्याखाली काही काळ श्वास रोखू शकतात, तर सागरी इगुआना १२ मिनिटांपर्यंत पाण्याखाली राहू शकतो.
सरड्यांचे सरासरी आयुष्य पाच ते दहा वर्षे असते, परंतु काही प्रजाती २० ते ५० वर्षे जगतात. कोमोडो ड्रॅगन हा अशा दीर्घायुषी सरड्यांचा राजा मानला जातो. रोगमुक्त आणि सुरक्षित अधिवासात तो ५० वर्षांहून अधिक काळ जिवंत राहू शकतो.
भक्षकांपासून सुटका मिळवण्यासाठी काही सरडे स्वतःची शेपटी तोडून टाकतात. शेपटी हालत राहिल्यामुळे शिकारीचे लक्ष विचलित होते आणि सरडा पळ काढतो. मात्र, याची किंमत मोजावी लागते अशी सरडे सामाजिक वर्चस्व आणि प्रजनन क्षमता गमावतात.
मेक्सिकन दाढीवाला सरडा हा निसर्गातील सहनशीलतेचा अद्भुत नमुना आहे. तो वर्षभरात फक्त तीन वेळा जेवून जगू शकतो! त्याच्या लहानशा शेपटीत भरपूर चरबी साठवलेली असते, जी महिनोन्महिने त्याला जगवते. हे सरडे मांसाहारी असतात आणि इतर सरडेही खातात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानात पुन्हा रक्तरंजित मोहीम! खैबर पख्तूनख्वात लष्कराची मोठी कारवाई; 55 हजार विस्थापित, लाखो लोक कर्फ्यूमध्ये कैद
सरडे फक्त ‘घराच्या भिंतीवर फिरणारे’ जीव नाहीत. ते कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, जैवविविधतेचा समतोल राखतात आणि पर्यावरणातील अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. मात्र, अधिवास नष्ट होणे, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जागतिक सरडा दिन आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतो निसर्गातील प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क आहे आणि त्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे.